अकोला: अकोल्यातील एका घटनेने राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय आहे. अकोल्यात एका गावगुंडाने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीभाईला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोल्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करण्यात आलं. नंतर तिच्यावर अमानवीय लैंगिक अत्याचार करण्यात आले. एवढंच नाही तर कैलासटेकडी स्मशानभूमी परिसरात विवस्त्र करीत तिची धिंड काढण्याचा प्रयत्नही झाला.
शहरातील कैलास टेकडी भागात परिसरात गुंड गणेश कुमरे याची दहशत आहे. पीडित मुलीचे वडील मजुरी करतात. तिला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे. गेल्या दोन वर्षांपासून या गुंडानं सातत्यानं दहशत माजवत मुलीवर अत्याचार केला. मात्र दोनदा पोलिसात जाण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांच्या दुर्लक्षामुळे निर्ढावलेल्या या गावगुंडानं मुलीचं आख्ख आयुष्यच बरबाद केलं.
बुधवारी आणि गुरूवारी या गुंडानं हैदोस घालत मुलीवर पुन्हा अत्याचार केला. शुक्रवारी या प्रकरणाची माहिती स्त्री चळवळीतील नेत्या आणि वंचितच्या प्रदेश महासचिव अरूंधती सिरसाट यांना मिळाली. या प्रकरणाला वाचा फुटली. मात्र अकोल्यातील खदान पोलिसांनी हे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळल्याचा आरोप अरूंधती सिरसाट यांनी अकोला पोलिसांवर केला.
गावगुंड गणेश कुमरेची गुन्हेगारी पार्श्वभूमी :
1) अकोल्यातील कैलासटेकडी भागातील गावगुंड अशी गणेशची ओळख.
2) गावगुंड गणेशची कैलासटेकडी परिसरात 'गणीभाई' या टोपणनावाने ओळख.
3) गणेशचा कैलासटेकडी परिसरात दारू आणि गांजाविक्रीचा धंदा.
4) त्याच्यावर खदान पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल.
5) गणेशच्या दहशतीमुळे लोक तक्रार करण्यास घाबरत असल्याची माहिती.
याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीभाईला अटक करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तर पीडित मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. सध्या अकोला पोलिसांची यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर मुलीच्या समाजातील नेत्यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवत मुलीच्या पुनर्वसनाची मागणी केली.
0 Comments