जळगाव तालुक्यातील वावडदे ते म्हसावद दरम्यान ईश्वर मंसाराम पाटील (रा. बिलवाडी) यांचे शेत आहे. तेथे पांडुरंग पंडित पाटील (५२, रा. बिलवाडी, ता. जळगाव) हे रखवालदार म्हणून काम करतात. १४ रोजी रात्री ते शेतात रखवालीसाठी गेले होते. त्यावेळी मध्यरात्री दरोडेखोरांनी शेतात प्रवेश करीत रोटोव्हेटर व ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रखवालदार पांडुरंग पाटील यांनी विरोध केला व दरोडेखोरांनी डोक्यात लोखंडी वस्तू मारून त्यांचा खून केला.
बुधवारी पहाटे सहा वाजता शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा म्हशीचे दूध काढण्यासाठी शेतात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती कळवल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती कळवण्यात आली. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान शेतातून चोरून नेलेले ट्रॅक्टर हे एरंडोल तालुक्यातील खडके फाटा येथे आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान पांडुरंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पांडुरंग पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आला. यावेळी कुटूंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला
0 Comments