नाशिक : ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिक शहर आणि जिल्ह्यातसुद्धा बहुतांश शासकीय लोकसेवकांकडून नागरिकांकडे लाचेची मागणी केली जात असल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे. अगदी पाचशे रुपयांसपासून ते एक कोटीपर्यंतची लाचेची प्रकरण मागील काही दिवसात समोर आल्याने खळबळ उडाली. मागील चार दिवसात चार कारवाया एसीबीकडून (ACB) करण्यात आल्याने ही लाचखोरी थांबणार तर कधी असा सवाल उपस्थित होत आहे
नाशिकसह विभागात लाचखोरी (Bribe) सुरूच असून या आठवड्यात चार दिवसात चार कारवाया एसीबीकडून करण्यात आल्या आहेत. यात पहिली कारवाई शहरातील विल्होळी पोलीस चौकीत घडली आहे. या प्रकरणात पोलिस कारवाईदरम्यान जप्त केलेला ट्रक सोडविण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्रयस्थ व्यक्तीमार्फत 35 हजार रुपये घेणाऱ्या पोलिसासह मध्यस्थाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. नाशिक पोलिस ठाण्यातील अंमलदार रवींद्र बाळासाहेब मल्ले आणि मध्यस्थ तरुण मोहन तोंडी अशी संशयितांची नावे आहेत.
2 हजार रुपये लाचेची मागणी
तर दुसऱ्या कारवाईत जळगाव शहरातील कारागृह परिसरात करण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रारदार यांचा मुलगा जिल्हा कारागृह जळगाव येथे असून त्यांच्या मुलाची कारागृहात भेट करून देण्यासाठी महिला कारागृह शिपाई हेमलता गयभू पाटील आणि पूजा सोपान सोनवणे यांनी 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. यात तक्रारदार यांना सदर लाचेची रक्कम आरोपी क्र.2 यांच्याकडे देण्यास सांगून सदर लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या तिनही कारागृह कर्मचारी, अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक लाख रुपयांची लाच
निफाड येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकाऱ्यास तब्बल एक लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी निफाड येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी राजेश शंकर ढवळे यांनी दीड लाख रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागीतली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचशे रुपयांच्या लाचेसाठी तिघांना अटक
नाशिकच्या मालेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. अवघ्या पाचशे रुपयांच्या लाचेसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मालेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर खांडेकर, डेटा एन्ट्री ऑपरेटर विठोबा शेलार, एजनट दत्तू देवरे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. जनरल मुक्तयर नोंदणी केलेला दस्त देण्यासाठी एजंट दत्तू देवरे यांनी लाच मागितली, तर शेलार याने स्वीकारली. या प्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments