रशियाचे हल्ले तीव्र, युक्रेनमध्ये हाहाकार ; २००० नागरिकांचा बळी

रशियाने युक्रेनमध्ये विध्वंसक हल्ले बुधवारी आणखी तीव्र केल़े. आठवडय़ाभरात शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, दोन हजार नागरिकांचा बळी गेल्याची माहिती युक्रेन सरकारने दिली़. त्यात दोन्ही देशांच्या मृत सैनिकांचा समावेश केल्यास युद्धबळींचा आकडा वाढणार असून, उभय देशांनी दुसऱ्या फेरीतील शांतता चर्चेची तयारी दर्शवली असली तरी ठिकाणाबाबत अनिश्चतता आह़े.

रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर रशियाने कीव्हबरोबरच, खार्कीव्ह आणि अन्य मोठय़ा लोकसंख्येच्या शहरांना लक्ष्य करत हल्लासत्र तीव्र केल़े. खार्कीव्हमधील पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयावर बुधवारी बॉम्बहल्ला करण्यात आला़. पंधरा लाख लोकसंख्येच्या या शहरातील निवासी भागांवर हल्ले वाढविण्यात आले आहेत़. चेर्नीहीव शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यात एक रुग्णालय उद्ध्वस्त करण्यात आल़े.युक्रेन किंवा रशियाने आपापल्या मृत सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नसल्याने गेल्या आठवडय़ाभरातील युद्धबळींची एकूण संख्या स्पष्ट झालेली नाही़. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सहा दिवसांत रशियाचे ६ हजार सैनिक ठार झाल्याचा दावा मंगळवारी केला होता़. त्याबाबत रशियाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही़, मात्र रशियाच्या हल्ल्यात आठवडय़ाभरात दोन हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेन सरकारने केला आह़े.

रशिया आणि युक्रेन यांच्यात दुसरी शांतता चर्चेबाबत मतैक्य आह़े, मात्र या चर्चेआधी रशियाने बॉम्बहल्ले थांबवावेत, अशी मागणी युक्रेनने केली आह़े. यामुळे या चर्चेबाबत अनिश्चतता आह़े. युद्धग्रस्त युक्रेनमधून आतापर्यंत ८,७४००० नागरिकांनी शेजारच्या देशांत स्थलांतर केले आह़े. ही संख्या लवकरच दहा लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आह़े.

तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर

तिसरे महायुद्ध झाले तर अण्वस्त्रांचा वापर होईल, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव यांनी बुधवारी दिला़. युक्रेन-रशिया यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असताना लाव्हरोव यांनी ‘अल जजीरा’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केल़े. तिसरे महायुद्ध हे विध्वंसक अणुयुद्ध असेल, या त्यांच्या युद्धखोर विधानामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आह़े.

चीनकडून पाठराखण : रशियाने युक्रेनवर हल्ले केल्यानंतरही चीनने रशियाची पाठराखण केली आहे. रशियाने त्यांच्या सुरक्षेसंदर्भात व्यक्त केलेली चिंता योग्य असून त्याचा विचार करायला हवा, ते गांभीर्याने घ्यायला हवं, असे रशियाचा मित्र असलेल्या चीनने म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e