राहाता : शहरानजीक असलेल्या साकुरी गावच्या शिवारात बालविवाह होत असल्याची माहिती पोलिसांना दूरध्वनीद्वारे अज्ञात व्यक्तीने दिल्यानंतर राहाता पोलिसांनी विवाहस्थळी धाव घेऊन साकुरी येथे होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन नवरी मुलगी तसेच नवरदेव यांचे आई वडिलांसह पाच जणांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साकुरी गावच्या शिवारात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याबाबतची माहिती पोलिसांना ११२ डायल नंबर व्दारे मिळाली होती त्यानंतर ही माहिती पोलिसांनी साकुरी गावचे ग्रामविकास अधिकारी रामदास डुबे यांना देताच त्यांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केली असता तेथे मंडप टाकून लग्नाची तयारी चालू होती. ग्रामविकास अधिकारी डुबे व पोलीस पथकाने विवाहस्थळी धाव घेतली असता नाशिक जिल्ह्यमतील निफाड येथील एका तरुणाशी या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला जाणार होता. पोलीस व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी नवरी मुलीचे वय माहीत करून घेण्यासाठी जन्मतारखेची खातरजमा केली असता नवरी मुलीची जन्मतारीख २ जून २००६ अशी कागदोपत्री दिसून आली. त्यानुसार नवरी मुलीचे वय १५ वर्षे ८ महिने २७ दिवस असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर मुलीचे व मुलाचे आई-वडील तसेच नवरदेव यांना ग्रामपंचायतमध्ये बोलावून समज देऊन मुलगी अल्पवयीन असल्याने हा विवाह करता येणार नसल्याचे सांगत या विवाहापासून परावृत्त करत पोलिसांनी हा विवाह रोखला. निफाड येथील असलेला नवरदेव तसेच साकुरी येथील असलेली नवरी मुलगी यांचे आई-वडील यांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुद्धा विवाह लावून देण्याची तयारी केली होती. ग्रामविकास अधिकारी रामदास डुबे यांनी येथील पोलीस ठाण्यात पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नसीर पठाण, तसलीन नसीर पठाण (दोघेही रा. साकुरी), समीर अनिस शेख, अनिस अहमद शेख, तसलीन अनिस शेख (तिघेही रा. कसबे सुकेणे तालुका निफाड जिल्हा नाशिक) या पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांची तत्परता तसेच पोलिसांनी वेळीच घटनास्थळी घेतलेली धाव व सुज्ञ नागरिकांनी फोनद्वारे पोलिसांना दिलेली कल्पना यामुळे हा बालविवाह रोखला गेला.
0 Comments