राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी गोंधळ झाला. गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावरुन राज्यापालांवर टीका केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यपालांवर टीका केलीय. मात्र आता सत्ताधारी पक्षांकडून होत असणाऱ्या या टीकेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
शरद पवार काय म्हणाले?
आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी राज्यपालांवर टीका केली. “हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार घसरुन कोणत्या पातळीवर जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. राज्यातील मंत्रीमंडळाला विधानसभा, विधानपरिषदेवर सभासद नेमण्याचा अधिकार आहे. वर्ष होऊन गेला तरी १२ आमदारांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही. याचा अर्थ एवढाच आहे की, ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेऊन कोणी काम करत असेल त्याच्यावर भाष्य न केलेले बरे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्याचा विचार करावा,” असा टोला पवारांनी लगावला.
अजित पवार काय म्हणाले?
राज्यपाल हे एक मोठे पद आहे. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलत असताना आपल्याकडे सगळय़ांचे लक्ष असते हे लक्षात ठेवावे आणि विचार करून बोलावे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं.
फडणवीसांनी काय म्हटलं?
नागपूर विमानतळावर शरद पवार असतील, संजय राऊत असतील सर्वांच्या वक्तव्यांमधून राज्यपाल हटाओ मोहीमच दिसतेय, असं म्हणत पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी राज्यपालांना मुद्दाम लक्ष्य केलं जात असल्याचं म्हटलंय. त्यांनी महाविकास आघाडीकडून संविधानात न बसणारं काम केलं जात असल्याचा दावा करत हे काम दाखवून दिल्यावर राज्यापालांना टार्गेट केलं जातंय असा दावा केलाय.
0 Comments