महिलांसाठी वसतिगृहांची उभारणी करा; पुण्यातील युवतींना मारहाण प्रकरणामुळे भारतीय महिला फेडरेशनची मागणी

 णे : शिक्षण आणि नोकरीसाठी घराबाहेर राहणाऱ्या किंवा बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मोठय़ा प्रमाणावर वसतिगृहे उभारावीत, अशी मागणी भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य शाखेकडून शनिवारी करण्यात आली आहे.

  भाडेकरू महिला, घर मालक आणि गृहनिर्माण संस्था यांच्यातील संबंधांबाबत एक आचारसंहिता तयार करावी, अशीही मागणी फेडरेशनकडून करण्यात आली आहे.

कथित तोकडे कपडे परिधान करणाऱ्या युवतींना पुण्यातील खराडी भागात त्यांच्याच गृहनिर्माण संस्थेतील नागरिकांनी मारहाण केली. त्या पार्श्वभूमीवर फेडरेशनतर्फे ही मागणी करण्यात आली आहे. फेडरेशनच्या राज्य सचिव लता भिसे सोनावणे आणि राज्य अध्यक्ष स्मिता पानसरे यांनी याबाबतचे पत्र राज्य शासनाला दिले आहे.

राज्यातील गावांमध्ये, शहरांमध्ये सर्व क्षेत्रातील संघटित, असंघटित क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी सोयीसुविधा असलेली वसतिगृहे उभी करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी भरघोस तरतूद आणि कार्यवाहीची मागणी फेडरेशनने केली असून मोठय़ा कंपन्यांना महिलांसाठी वसतिगृहे उभारणे बंधनकारक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

वसतिगृहांच्या उभारणीसाठी शहर आणि जिल्हा नियोजन आराखडय़ात जागा आरक्षित करून ठेवाव्यात असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सहा जणांना अटक, न्यायालायाकडून जामीन मंजूर

माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतींनी तोकडे कपडे परिधान केल्याने शेरेबाजी करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. याप्रकरणी अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ज्योती संजय येळे (रा. लेक्सीस सोसायटी, अनसूया पार्क, रक्षकनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले आरोपी शनिवारी न्यायालयात स्वत:हून हजर झाले. अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने सहा जणांची प्रत्येकी १२०० रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली, असे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी सांगितले.

स्वयंघोषित संस्कृतीरक्षक वाढत आहेत. महिलांचे लोकशाही हक्क आणि निवडीचे हक्क यावर हा घाला आहे. कोणी कोणता पोशाख घालावा याच्या निवडीचे स्वातंत्र्य सर्वाना आहे.  -स्मिता पानसरे, अध्यक्ष आणि लता भिसे सोनावणे, राज्य सचिव, भारतीय महिला फेडरेशन

पेहराव पद्धतीत खूप बदल होत आहेत. युवतींच्या पोशाखाबाबत आक्षेप घेऊन त्यांना धमकावणे, मारहाण करणे चुकीचेच आहे. 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e