प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या भावावर गोळीबार

 माणगावातील गुन्हयाचा छडा , चौघांना बेडया; एकाचा तपास सुरू

अलिबाग  – मागील महिन्यात  माणगाव येथील मेडिकल दुकानदारावर झालेला गोळीबार प्रेमप्रकरणातून झाल्याचे तपासात समोर आले आहे. प्रेयसीचा भाऊ प्रेमात अडसर ठरतो म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून त्यांचा अन्य एक साथीदार फरार आहे

मयूर सुरेश गवळी (२१), शीळफाटा, मुंब्रा, अजय महादेव अवचार (२०), नौसिल नाका रबाळे, राजेश विजय शेळके (२२), नोसिल नाका रबाळे, नितीन शिरमाजी कांबळे(२४), नोसिल नाका रबाळे नवी मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार फरार आहे. दरम्यान मयूर सुरेश गवळी हा यातील प्रमुख आरोपी आहे. हे सर्व मूळचे परभणीचे रहिवाशी आहेत. मयूर गवळी याची शुभम जयस्वाल यांच्या बहिणीबरोबर इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेम जमले. परंतु या प्रेमात शुभम जयस्वाल हे अडसर ठरत होते. त्यांनी त्यांच्या बहिणीचा फोन काढून घेतला होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा निर्णय मयूरने घेतला.

१२ फेब्रुवारी २०२२ ला रात्री  शुभम जयस्वाल मेडिकल दुकान बंद करून घरी जात असताना काळय़ा रंगांच्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी शुभम जयस्वाल यांच्या पोटात पिस्तुलातून गोळी झाडली. दैवबलवत्तर म्हणून ..शुभम जयस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करून आरोपी फरार झाले. शुभम हे यात गंभीर जखमी झाले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शुभमला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला. 

सीसीटीव्ही फुटेज आले कामी

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि त्यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक अशोक दुधे, यांच्या मार्गदर्शनाखाली  तपास सुरू केला. प्राथमिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजची या तपासात खूपच मदत झाल्याचे या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

धमकीच्या फोनवरून तपासाला वळण

शुभम जयस्वाल यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा तपास सुरू असताना एकेदिवशी जखमी शुभम जयस्वाल यांचे वडील ज्ञानचंद जयस्वाल यांना फोन करून अज्ञाताने दोन दिवसांत २ कोटी रुपये देण्याची मागणी केली. नाहीतर तुझ्या परिवारास मुलाप्रमाणे ठार मारू अशी धमकी दिली. आरोपीच्या धमकी कॉलचा तपास घेत असताना पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. त्यांचा एक साथीदार फरार आहे. शुभमला ठार मारण्यासाठी मयूरने ८० हजारांची सुपारी दिली होती.

या तपासात सहाय्यक फौजदार गिरी, पोलीस हवालदार दीपक मोरे, सुधीर मोरे, अमोल हांबीर, प्रतीक सावंत, जितेंद्र चव्हाण, पोलीस नाईक ईश्वर लांबाटे, अक्षय सावंत, देवराम कोरम, सायबर सेलचे अक्षय पाटील, तुषार घरत यांचीदेखील पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मोलाची साथ मिळाली.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e