तब्बल चार महिन्यांनंतर आग लागण्याचे कारण उघड
नगर : जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागातील वातानुकूलित यंत्रणेचा सातत्याने अतिवापर (२४x७) झाला, त्यामुळे या यंत्रणेत भडका उडून अतिदक्षता विभागात आग लागल्याची व त्यातच गुदमरून रुग्णाचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता विद्युत निरीक्षकांनी विभागीय आयुक्तांची चौकशी समिती व जिल्हा पोलीस दलाला दिलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयातील अग्निकांडाच्या मूळ कारणावर तब्बल चार महिन्यानंतर प्रकाश पडला आहे. शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या करोना रुग्ण अतिदक्षता विभागात गेल्या दि. ६ नोव्हेंबरच्या सकाळी आग लागून तब्बल १४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. आगीच्या घटनेसंदर्भात तसेच त्यानंतरच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारने नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. आगीच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी विद्युत निरीक्षकांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
तसेच जिल्हा रुग्णालय प्रशासन किंवा आरोग्य विभाग यापैकी कोणीही रुग्णांचा तडफडून मृत्यू होऊनही तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी अखेर स्वत:हून गुन्हा नोंदवला. मात्र हा गुन्हा आग लागण्याच्या कारणांऐवजी, आगीच्या घटनेनंतर दाखवलेल्या हलगर्जीपणाबद्दल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह पाच जणांना अटक केली. विभागीय आयुक्तांनी चौकशी करून राज्य सरकारला अहवाल सादर केला, मात्र त्यानंतरही अतिदक्षता विभागात आग कशामुळे लागली याचे कारण गुलदस्त्यातच राहिले होते. विभागीय आयुक्तांनी अहवाल तयार करताना विद्युत निरीक्षकांचा अहवाल विचारात घेतला. पोलिसांनाही तपास करण्यासाठी विद्युत निरीक्षकांच्या अहवालाची आवश्यकता भासत होती. यासाठी तपासी अधिकाऱ्यांनी विद्युत निरीक्षकांकडे वारंवार अहवालाची मागणी केली. विद्युत निरीक्षकांकडून दिरंगाईने का होईना नुकताच हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यामुळे आता तपासाला अधिक चालना मिळणार आहे. याच अहवालाच्या आधारे पोलिसांनी डॉ. पोखरणाला अटक केली.
आग अशी लागली
वातानुकूलित यंत्रणेचा सातत्याने अतिवापर (२४x७ दिवस) झाल्याने यंत्रणेच्या आतील भागात (इनडोअर युनिट) प्रचंड उष्णता निर्माण झाली. उष्णतेचे वहन होऊन यंत्रणेच्या आतील भागातील ‘पीसीबी सर्किट’ जळाले. त्यामुळे यंत्रणेतील ‘डायक्लोरेन मिथेन’ या अतिज्वलनशील वायूचा भडका उडाला व या यंत्रणेने पेट घेतला. या कारणामुळे कोविड अतिदक्षता विभागात आग लागल्याची व त्यामध्ये गुदमरून रुग्णांचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता विद्युत निरीक्षकांनी अहवालात नमूद केल्याचे खात्रीलायक समजले.
जिल्हा शल्यचिकित्सकांवर जबाबदारी
आगीची घटना घडली त्या वेळी थंडीचे दिवस होते. वातानुकूलित यंत्रणेचा अनावश्यक व अतिवापर होत असताना त्यावर नियंत्रण ठेवले गेले नाही. जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांच्यावरच जबाबदारी होती, त्यांनी याबाबत हलगर्जीपणा दाखवला, असे मत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व प्रशासनातील अधिकारी व्यक्त करतात.
0 Comments