पहिने डोंगरावरील वणव्यात २५ हेक्टर जंगल खाक

 नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील पहिने येथील डोंगरावर मंगळवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यात सुमारे २५ हेक्टरवरील गवत आणि झाडांचे मोठे नुकसान झाले. पहाटे ही आग विझविण्यात यश आले. फिरण्यासाठी डोंगरावर गेलेल्या बंगाली युवकांकडून सिगारेट वा तत्सम ज्वलनशील पदार्थ फेकला गेल्याने आग लागल्याचा संशय आहे.  स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकत्र्यांनी सात संशयितांना पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.

मंगळवारी सायंकाळी पहिने ते सामुंडी रस्त्यावरील डोंगरावर हा प्रकार घडला. या भागात काही बंगाली युवक फिरण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून पेटती सिगारेट फेकली गेल्याने आग लागल्याचा संशय आहे. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. ही बाब लक्षात आल्यावर ग्रामस्थांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, गिर्यारोहकांनी धाव घेत डोंगरावरून खाली उतरणाऱ्या संशयितांना पकडले. याबाबतची माहिती वन विभागाला कळविण्यात आली. त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याचे वसुधा फाळके आणि अमरीश मोरे यांनी सांगितले. वारा वाहत असल्याने आग वेगात पसरली. वारा कमी झाल्यानंतर झाड फाटा वापरून आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न करावे लागले. तोपर्यंत नैसर्गिक साधन संपत्तीची अपरिमित हानी झाली.

हा वणवा मानवनिर्मित असल्याचे वन विभागाने मान्य केले. ताब्यात घेतलेले सात संशयित हे सुवर्ण कारागीर असून त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. नाशिकच्या सराफ बाजारात ते अलंकार घडविण्याचे काम करतात, अशी माहिती तपासात उघड झाली. चौकशीअंती संबंधितांवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे वन विभागाने म्हटले आहे.

चौकशीत भाषेचा अडसर

वणव्याप्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सर्व बंगाली भाषिक असून त्यांना इंग्रजी वा हिंदूी भाषा येत नसल्याने वन विभागाला चौकशीत अडचणी येत आहेत. संबंधितांचे आधारकार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची ओळख होऊ शकलेली नाही. संशयितांच्या हिंदूी बोलता येणाऱ्या नातेवाईकांना वन विभागाने बोलावून घेतले. तसेच बंगाली भाषेचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने संशयितांची चौकशी केली जाणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

वणवा विझविण्यासाठी आठ तास प्रयत्न

पहिने येथील डोंगरावर लागलेल्या वणव्यात सुमारे २५ हेक्टरवरील क्षेत्रातील गवत, झाडांचे नुकसान झाले. वाऱ्याची दिशा जशी बदलली, तसा वणवा वेगवेगळय़ा भागात पसरला. आग विझविण्यासाठी ग्रामस्थ व वन विभागाचे पथक अशा ३५ ते ४० जणांनी सलग आठ तास अथक प्रयत्न केले. बुधवारी पहाटे तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल राजेश पवार यांनी सांगितले. आगीत गवत व अन्य झाडांचे नुकसान झाले. परिसरात सागाची मोठय़ा प्रमाणात झाडे आहेत. तीन वर्षे वयाची ही झाडे असून आगीची त्यांना फारशी झळ बसणार नसल्याचे पवार यांनी नमूद केले.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e