महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये वाहकांबरोबरच चालकांचीही संख्या मोठी असल्याने वाहतुकीचे वेळापत्रक अद्याप विस्कळीतच आहे. ते सुरळीत करण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवडय़ात निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. संप मिटत नसल्याने एसटीत यापूर्वी १,७५० कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली आहे. आता आणखी ११ हजार चालकांची भरती करण्यात येईल. वाहकही मोठय़ा संख्येने संपात सामील आहेत. त्यामुळे चालकांची भरती करताना वाहकांची भरती का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर उपाय म्हणून सध्या चालक आणि वाहक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येणार आहे. सध्या एसटीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८१ हजार ६८३ असून त्यातील ३१ हजार २३४ कर्मचारीच कामावर आहेत.
वाहकांच्या कमतरतेचे काय?११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे, परंतु वाहकांची नाही. ही वाहकांची कमतरता कशी भरून काढणार, असा प्रश्न आहे. परंतु सध्या चालक आणि वाहक अशी दोन्ही कामे करणाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एसटीत खासगी संस्थेमार्फत मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. जसजशी गरज असेल, त्याप्रमाणे त्यांना सेवेत घेतले जाईल.
0 Comments