चंद्रपूर : प्रियकराची भेट घेण्यासाठी चोराळा शिवारात गेलेल्या एका युवतीचा अपघाती मृत्यू झाला. पडोली पोलिसांनी सखोल चौकशी न करता प्रियकर अभिषेक देशभ्रतार याने दिलेल्या माहितीनुसार अपघाताचा गुन्हा नोंद केला. दरम्यान, मृत मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी सीबीआय किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करावी, अशी मागणी मृत मुलीचा भाऊ नितेश मेहता व युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी केली आहे.
चोराळा शिवारात १६ मार्चला दुपारच्या सुमारास शीतलचा घातपात करून नियोजित पद्धतीने तिचा प्रियकर व त्याच्या साथीदारांकडून खून करण्यात आला आहे. या प्रकरणात पडोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्या कुटुंबीयांनी पाहिलेल्या स्थितीवरून सामूहिक अत्याचार केल्याचे स्पष्ट दिसून येते. पोलिसांकडून अपघात दाखवला जात असला तरी शीतलच्या दुचाकीला किंवा शरीराला कुठेही जखमा नाही. केवळ गुप्तांगाला इजा झाली असल्याने तिचा प्रियकर व साथीदारांनी शीतलवर सामूहिक अत्याचार करून खून केल्याचा आरोप निलेश आणि सूरज ठाकरे यांनी केला आहे. शीतलची मैत्रीण या प्रकरणात मुख्य साक्षीदार असताना तिचे अद्यापही बयाण घेण्यात आलेले नाही. पडोली पोलिसांकडून कोणत्याही शंकेचे निराकरण केले जात नाही. सदर घटना १६ मार्चला घडली असताना १७ मार्चला दुपारी १२ वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. अशा प्रकरणात पॅनेलमध्ये शवविच्छेदन करण्यात आलेले नाही. शीतलच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी प्रियकराच्या सांगण्यावर विश्वास ठेवून अपघाताची नोंद केली आहे. घटनेच्या वेळी प्रियकरासोबत आणखी चार साथीदार होते. त्यांचीही चौकशी करण्यात आली नाही.
0 Comments