पहिली घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून 26 वर्षीय आशिष जयलाल बिसेन यांची हत्या त्याच्याच मामेभावाने केली आहे. तर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 वर्षीय जयकिशन जानवकर या तरुणाची हत्या झाली आहे. दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
कौटुंबिक वादातून तरुणाची मामेभावाकडून हत्या
हत्येची पहिली घटना ही हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा डोंगरगाव येथील बंद टोल नाक्याजवळ घडली आहे. या प्रकरणातील आरोपी निलेंद्र बघेल हा रविवारी त्याचा मामेभाऊ आशीष बिसेन याला दारू पिण्याच्या बहाण्याने घेऊन गेला होता. त्यानंतर दोघांनी दारू सुद्धा प्यायली. मात्र त्यानंतर दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद निर्माण झाला. त्याच वादातून निलेंद्रने आशिषची हत्या केली. आशिष घरी आला नाही म्हणून त्याच्या आईने पोलिस ठाण्यात आशिष बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी निलेंद्रकडे चौकशी केली तेव्हा त्याने पोलिसांना घाबरून सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन हिंगणा पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर आरोपीने मृतदेह ज्याठिकाणी फेकला होता त्या ठिकाणी घेऊन गेला. पोलिसांनी आशिषचा मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
संपत्तीच्या कारणावरुन भावोजीकडून मेव्हण्याची हत्या
हत्येची दुसरी घटना ही हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती नगर येथे भावोजीने स्वतःच मेहुण्याची हत्या केली आहे. जयकिशन शाम जानवकर असे मृतकाचे नाव आहे. त्याची हत्या संपत्तीच्या वादातून त्याच्याच भावोजीने केली आहे. नितेश सोनवणे असे आरोपीचे नाव आहे. रात्री 12 वाजल्याच्या सुमारास जयकिशन आणि त्याच्या बहिणीमध्ये संपत्तीच्या कारणावरून वाद सुरू होता. त्याच दरम्यान नितेश त्या ठिकाणी आला त्याने रागाच्या भरात फावड्याने जयकिशनच्या डोक्यावर वार केला. ज्यामुळे जयकिशनचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी नितेश सोनवणे याने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नितेशचा गुन्हेगारी रेकॉर्ड होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडली नाही म्हणून नागपूर पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती.मात्र मार्च महिन्यात एकामागे एक खुनाच्या घटना घडल्याने फेब्रुवारी महिन्याचा बॅकलॉग भरून निघाला आहे. मार्च महिन्यात एकूण 11 खुनाच्या घटना घडल्या असून यामध्ये अनेक घटना कौटुंबिक वादातून घडल्या आहेत
0 Comments