उस्मानाबाद : शेतात येऊ देत नसल्याने मोठ्या भावाकडून लहान सख्ख्या भावाचा खून

सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लहान भावाला दारुचे व्यसन होते. सतत भांडणे करून शेतात येऊ देत नसल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा काठीने व दगडे घालून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून मोठ्या भावाला अटक केली आहे. ही घटना परंडा तालुक्यातील सोनगिरी येथे रविवारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, परंडा तालुक्यातील सोनगिरी या गावामध्ये राहणारे खरपुडे कुटुंबियांचा शेती व्यवसाय आहे. शेतात येऊ नये, यावरून मयत पोपट खरपुडे आणि त्याचा मोठा भाऊ महादेव खरपुडे यांच्यात नेहमी शाब्दिक खटके उडत होते. मयत पोपट खरपुडे यास दारुचे व्यसन असल्याने त्यांच्यात कधी कधी टोकाचे वाद व्हायचे. २४ एप्रिलरोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोठा भाऊ महादेव खरपुडे व पुतण्या सुधीर खरपुडे याने आपला सख्खा लहान भाऊ पोपट खरपुडे यांच्या डोक्यावर दगड व काठीने मारहाण केल्याने पोपट हा गतप्राण झाला.
घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, पोलीस कर्मचारी विशाल खोसे, दिलीप पवार, बळी शिंदे, एस. सी. गायकवाड, ए. बी. वाघमारे, चालक भेगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आरोपी आणि मयताचा नातेवाईक नवनाथ वेताळ यांच्या फिर्यादीवरुन परंडा पोलीस ठाण्यात आरोपी महादेव खरपुडे व सुधीर खरपुडे यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, किरकोळ जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याने परंडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e