पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ओटास्कीम, निगडी येथे मोठी कारवाई केली. त्यात पोलिसांनी 24 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त केला.
तसेच, दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एका महिलेला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 23) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केली.
शारदा रामा जाधव (वय 25, रा. ओटास्कीम, निगडी), सावळा शिवाजी खाडे (रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा जाधव या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस नाईक प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम येथे एक महिला गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी सिद्धार्थ नगर, झोपडपट्टी ओटास्कीम येथे छापा मारून कारवाई केली.
आरोपी महिला शारदा जाधव ही गांजा विकत असल्याचे पोलिसांना आढळले. तिच्याकडून 71 हजार 75 रुपये किंमतीचा दोन किलो 793 ग्रॅम गांजा जप्त केला. हा गांजा तिने कुणाकडून आणला. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता तिला हा गांजा विक्रीसाठी सावळा खाडे या व्यक्तीने दिला असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी सावळा खाडे याच्या घरावर छापा मारला. दरम्यान पोलीस आल्याचे लक्षात आल्याने सावळा खाडे पळून गेला. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात पाच लाख 34 हजार 50 रुपये किंमतीचा 21 किलो 362 ग्राम गांजा आढळून आला.
दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी 24 किलो 205 ग्राम गांजा जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.
0 Comments