पालघरमधील गडचिंचले साधू हत्या प्रकरणातील १० आरोपींना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला, तर आठ जणांना जामीन नाकारला.
मुंबई : पालघरमधील गडचिंचले साधू हत्या प्रकरणातील १० आरोपींना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला, तर आठ जणांना जामीन नाकारला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी या प्रकरणी शुक्रवारी आरोपींच्या जामीन याचिकांवर निर्णय देताना १० आरोपींना जबाबदार धरले जाईल असे कृत्य त्यांनी केल्याचे दिसून येत नाही, असे नमूद केले आणि त्यांना जामीन मंजूर केला.
याचिकाकर्त्यांचा प्रकरणातील सहभाग लक्षात घेतला तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चित्रिकरणातून त्यांच्या हातात शस्त्र असल्याचे दिसते. परंतु त्यांनी कोणतेही कृत्य केलेले नाही हे स्पष्ट होते, असे निरीक्षणही न्यायमूर्ती डांगरे यांनी त्यांना जामीन मंजूर करताना नोंदवले. अन्य आठ आरोपी हे मृत्युमुखी पडलेल्या साधूवर हल्ला करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद चित्रिकरणात दिसत आहे. त्यामुळेच त्यांना जामीन नाकारला जात आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
0 Comments