बारामती : पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाला अटक

बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना मुढाळे (ता. बारामती) येथे घडली. पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या नराधम बापाविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. बारामती न्यायालयाने त्याला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पिडीत मुलीनेच याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ऑक्टोबर २०२१ ते ६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत घरामध्ये ही घटना घडली असल्याचे या मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी ही घरात अभ्यास करत बसली असताना तिच्या पित्याने तेथे येत तिचा विनयभंग केला. तिने त्यास विरोध करत मी ही बाब आईला सांगेन असे म्हटले. त्यावर त्याने तिला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. दि. ६ नोव्हेंबर रोजी पिडिता घरात झोपली असताना पित्याने तेथे येत तिच्या अंगावरील गोधडी ओढून घेत तिच्याशी लैंगिक चाळे केले. फिर्यादी ओरडली असता तो दुसऱ्या खोलीत निघून गेला. त्याच दिवशी पित्याने दारु पिवून येत पुन्हा तिच्याशी चाळे करत तिचा विनयभंग केला.
त्यानंतर पिडीत मुलगी साखरवाडी (ता. फलटण) येथे मामांकडे राहण्यास गेली. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादीच्या आईला आरोपीने मारहाण केली. त्यामुळे ती सुद्धा माहेरी निघून गेली. तेथे अगोदरपासूनच राहत असलेल्या मुलीने आईला आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर त्या दोघींनी पोलिस ठाण्यात येत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी ४३ वर्षीय नराधम पित्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याला बुधवारी (दि. १३) रोजी बारामती न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील अॅड. स्नेहल नाईक यांनी नराधम पित्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्याला दि. १६ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e