बायोडिझेलची पुन्हा अवैध विक्री; प्रशासन कुंभकर्णच्या झोपेत

खापर (नंदुरबार) : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अक्कलकुवा तालुक्यात वाण्याविहीर ते पेचरीदेवदरम्यान हॉटेल व ढाब्यावर पुन्हा अवैध बायोडिझेलची सर्रास विक्री सुरू झाली आहे. हे सर्वच जण उघड्या डोळ्यांनी पाहत असताना, प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईनंतर (Nandurbar News) विक्रेते पुन्हा सक्रिय झाले आहेत. ते बिनधास्तपणे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे त्यांना पाठबळ कोणाचे, असा प्रश्‍न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
इंधन दरवाढीने सामान्य जनता हैराण झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे ७५ रुपये प्रतिलिटर असलेल्या डिझेलने सध्या शंभरी पार केली आहे. त्यात मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाई वाढली आहे. दरवाढीमुळे अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यात डिझेलऐवजी बायोडिझेलसदृश इंधन विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पेट्रोलपंपावर मिळणारे डिझेल १०४ रुपये प्रतिलिटरच्या जवळपास असताना, बायोडिझेलची २५ ते ३० रुपये स्वस्त दराने विक्री होत आहे. त्यामुळे डिझेल विक्रीत प्रत्यक्षात घट झाल्याचा अंदाज असून, बायोडिझेलसदृश इंधनाची तालुक्यात आयात व विक्री अधिक वाढली आहे. लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या येथील हॉटेल्स व ढाब्यावर थांबतात, तेथे सहज मिळणारे कमी दरातील अवैध बायोडिझेल त्यांना फायदेशीर ठरते. दरम्यान, जानेवारीत अक्कलकुवा तालुक्यातील खापर परिसरातील ढाबा आणि हॉटेलमध्ये अवैध बिनबोभाटपणे बायोडिझेलची विक्री होत होती.

विक्री कोणाच्या आशीर्वादाने?

पोलिस व महसूल विभागाच्या सुस्त कारभारावर आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. अवैध बायोडिझेलची होत असलेली सर्रास विक्री कोणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनतेला हा प्रकार दिसत असताना, प्रशासन मात्र कुंभकर्णच्या झोपेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनाला कुंभकर्ण झोपेतून जाग येईल तरी केव्हा? असा सवाल उपस्थित होत आहे.

डिझेल पंपांनाही फटका

दरम्यान, डिझेलपेक्षा २० ते ३० रुपये प्रतिलिटर कमी दराने बायोडिझेल उपलब्ध होत आहे. लांब पल्ल्याचा वाहनांना (ट्रकांना) ते जास्त लागते. त्यामुळे प्रतिलिटर ३० रुपये दर धरला, तरी ती फरकाची रक्कम चालकांसाठी नफ्याची असते. त्यामुळे चालकांचा फायदा होतो. महामार्गावरील अवैध बायोडिझेल टाकण्यावर चालकांचाही भर असतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलपंपावर आता ट्रकची गर्दी डिझेल भरण्यासाठी कमी होत आहे. त्याचा फटका पंपचालकांना बसत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e