कोरोना बळींचा आकडा सहा हजारांवर?; पोर्टलवर मात्र २५९१ नोंद

जळगाव : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा खरा आकडा राज्य सरकार लपवीत असल्याच्या आरोपाला जळगाव जिल्ह्यातील आकडेवारीने दुजोरा मिळाला आहे. जिल्ह्यातील (Jalgaon) कोरोना मृत्यूची पोर्टलवरील नोंद २५९१ असताना कोरोनामुळे बळींच्या वारसांना आर्थिक मदतीसाठी प्राप्त अर्जांचा आकडा मात्र साडे आठ हजारांवर आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी ६१०० अर्ज मंजूर झालेय. म्हणजे शासनानेच जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक कोरोना बळी (Corona Death) झाल्याचे मान्य केले आहे. 
दोन वर्षापासून जगभरात, देशात व पर्यायाने राज्यातही कोरोनाच्या (Corona) महामारीने थैमान घातले आहे. दोन वर्षांनंतर देशातील स्थिती नियंत्रणात आली असली तरी या काळात महामारीने लाखो बळी घेतले. मात्र, याच कोरोना बळींच्या आकड्यांवरून देशभरात, राज्यातही आरोप- प्रत्यारोप झाले. देशात विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने तर महाराष्ट्रात भाजपने (BJP) सरकारवर कोरोना बळींचा आकडा लपविल्याचे आरोप केलेत. प्रत्यक्षात ना त्याची चर्चा झाली, ना चौकशी.

जिल्ह्यातील स्थिती

राज्यांनी अथवा देशभरात असे झाले असेल तर स्वाभाविक जिल्ह्याजिल्ह्यातून गेलेली आकडेवारी त्यास कारणीभूत ठरते. जळगाव जिल्ह्यातही कोविड पोर्टलवर दररोज अपडेट होणाऱ्या अहवालानुसार मार्च २०२० ते एप्रिल २०२२ या दोन वर्षांत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २५९१ दर्शविला आहे. प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचा आरोप याआधी झाला आहे 

मदतीचे अर्ज आठ हजारांवर

कोविड पोर्टलवरील मृत्युंची नोंद २५९१ असली तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा तिप्पट, चौपटीने बळी गेल्याचे सांगितले जाते. कोविडने मृत झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजारांची मदत देण्याचे शासन धोरण ठरल्यानंतर त्यासाठी अर्ज मागविण्यात आलेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून ८ हजार ५०० अर्ज प्राप्त झालेत. त्याची छाननी, पडताळणी होऊन तब्बल ६१०० अर्ज मंजूर झाले असून त्यांना एकतर सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळालीय, अथवा मिळण्याच्या प्रक्रियेत आहे. उर्वरित ११०० अर्ज प्रलंबित असून त्यापैकी काही अर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे. अन्य १३०० अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

याचाच अर्थ असा की, प्रशासनाने जिल्ह्यात ६१०० कोविड मृत्यू मान्य केले आहेत. त्यामुळे कोविड मृतांचा आकडा खरा आकडा लपविला जात असल्याच्या आरोपाला या आकडेवारीने पुष्टी मिळत असल्याचे मानले जात आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e