१६ मे रोजी पूजा झाल्यानंतर भंवरलाल बेपत्ता झाले. आता गुरुवारी त्यांचा मृतदेह रामपुरा रस्त्यावर सापडला. त्यानंतर भंवरलाल यांना मारहाणीचा व्हिडीओही समोर आला आहे. या प्रकरणात भाजपा नेता दिनेश कुशवाह याला पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे व्हिडीओत
भाजपाचा नेता दिनेश कुशवाहा या व्हिडीओत मानसिक रुग्ण असलेल्या भंवरलाल यांना आधारकार्ड दाखवण्यास सांगतो आणि वारंवार मारताना दिसतो आहे. मानसिक विकलांग असलेल्या भंवरलाल यांना आरोपी भाजपा नेता नाव विचारतो, तेव्हा भवरलाल चुकून त्यांचे नाव मोहम्मद असे सांगतात. त्यानंतर दिनेश त्यांच्यावर तुटून पडताना व्हिडीओत दिसतो आहे.
कोण आहे दिनेश कुशवाहा
या प्रकरणात दिनेश कुशवाहा याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दिनेश कुशवाह हा भाजपा युवा मोर्चाचा नगराचा पदाधिकारी राहिलेला आहे. त्याची पत्नी मानसी ही नगरपरिषदेच्या वॉर्डमधून निवडून आली होती.
मानसिक रुग्ण होते भवरलाल
रतलामच्या सिरसा गावच्या सरपंच पिस्ताबाई चत्तर यांना तीन मुलं होती. त्यात भवरलाल हे मोठे होते. अशोक आणि राजेश ही त्यांनी दोन्ही मुलेही समाजसेवेत आहेत. मोठा मुलगा भवरलाल हा मानसिक रुग्ण असल्याने त्याचे लग्नही करण्यात आलेले नव्हते.
चित्तोडगड किल्ल्यातून भवरलाल झाले बेपत्ता
चितोडगड येथून १६ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास भवरलाल कुणालाही न सांगता तिथून बसमधून निघून आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेहच मिळाला.
मारहाण केल्याचा व्हिडीओ आरोपीनेच केला व्हायरल
हा मारहाणीचा व्हिडीओ आरोपी दिनेशनेच एका व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केला. तिथून तो भवरलाल यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचला. पोलिसांनी याच व्हिडीओच्या आधारावर भाजपा नगरसेवकाच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केला. सुरुवातीला पोलीस या प्रकरणात कारवाीस टाळाटाळ करत होते. मात्र नंतर ३०२ आणि ३०४ कलमखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीतच भवरलाल यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मारहाण करणाऱ्यांनी त्यांच्या खिशातले २०० रुपयेही चोरले.
या हत्येनंतर राजकारण
यानंतर राज्याच गृहमंत्री निरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की पीडित कुटुंबीयांशी त्यांचे बोलणे झाले आहे, मात्र कुटुंबीयांनी बोलणे झाले नसल्याचे सांगितले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणात मध्यप्रदेशात काय सुरु आहे, असा सवाल करत शिवराजसिंह चौहान यांना प्रश्न विचारला आहे. काँग्रेस नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी याबाबत सरकारला घेरले आहे. तर निरोत्तम मिश्रा यांनीही दिग्विजय सिंह हे इतर धर्मांबाबत का बोलत नाहीत, असा आश्चर्यकारक प्रश्न विचारला आहे.
0 Comments