सोलापूर : अनेकदा असं वाटत असतं की पैसा असेल तर संसार चांगला टिकतो. पण पैसा घरात येऊनही मनं आणि स्वभाव जुळले नाहीत तर संसार तुटतो याचं एक जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. पैसा म्हणजे सर्वकाही नाही हे यावरून पुन्हा एकदा समोर आलं आहे.
दीड दीड लाख रुपये कमवणाऱ्या दाम्पत्याला घटस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. हातावरची मेहेंदी आणि अंगावरची हळद उतरून एक महिना होत नाही तोच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
बड्या कंपनीत दोघंही चांगल्या पगारावर होते. दीड दीड लाख रुपये दोघंही कमवत होते. मात्र स्वभाव एकमेकांना पटत नसल्याचे कारण सांगून दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.
सोलापूरमध्ये स्थायिक असलेले मात्र पुण्यातील मोठ्या कार्पोरेट कंपनीत नोकरीला असलेल्या पती-पत्नीचा कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी घटस्फोट याचिका अर्ज मंजूर केला.
दोघांचा स्वभाव एकमेकांना पटत नसल्यामुळे ते गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत होते. पत्नी वंदना आणि पती महेश या दोघांचे एमबीए शिक्षण झाले आहे.
वंदना आणि महेश दोघेही पुण्यातील एकाच कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करीत होते. ओळखीने दोघांचा विवाह नोव्हेंबर २०२० मध्ये सोलापूर येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला.
लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच पती-पत्नीचा स्वभाव जुळत नव्हता. क्षुल्लक आणि किरकोळ कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. दोघांनी पूर्ण विचारांती सहसंमतीने घटस्फोट घेण्यासाठी अॅड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील हिंदू विवाह कायदा 1955 कलम 13 बी प्रमाणे सहसंमतीने घटस्फोट याचिका मार्च 2022 मध्ये दाखल केली होती.
दोघांमध्ये कोणतेही आर्थिक देवाण-घेवाण नाही. दोघे उच्च द्विपदवीधर आहेत. दोघांना एक लाख ते दीड लाख पगाराची नोकरी आहे. पत्नीला दुसरे स्थळ आले आहे. त्यामुळे सहा महिने थांबणे शक्य नाही असा युक्तिवाद वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी घटस्फोट मंजूर केला.
0 Comments