इगतपुरी येथे २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या, नाशिकमधील घटनेने खळबळ; घरांचीही जाळपोळ

इगतपुरी, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मॉब लिंचिंगसारखी घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीत पहाटे ३ वाजेच्या सुमाराला ही घटना घडली आहे. एका २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
अधरवड येथील कातकरी वस्तीत पहाटेच्या सुमारास मोठा राडा झाला यावेळी जमावाने ३ कातकरी कुटुंबांची घरेही जाळून टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. १० ते २० जणांच्या टोळक्याने जाळपोळ आणि मारहाण केल्याने ही घटना घडल्याचे समजते. बारशिंगवे ता. इगतपुरी ह्या भागातील हे टोळके असून तेही आदिवासी समाजाचे आहेत.
जमिनीच्या वादामधून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तपासकार्यला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. अधरवड येथील आदिवासी कातकरी वस्तीमध्ये शरद महादू वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा बारशिंगवे येथील आदिवासी व्यक्तींशी जमिनीचा वाद आहे. हा वाद गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. शुक्रवारी दुपारी या प्रकरणी बारशिंगवे भागातील ४० ते ५० जणांचे संतप्त टोळके लाठ्याकाठ्या आणि दांडके घेऊन कातकरी वस्तीत आले होते. स्थानिक पोलीस पाटील आणि रहिवाश्यांनी यावेळी मध्यस्थी करून वाद मिटवला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
शनिवारी पहाटेच्या वेळी टोळक्यातील १० ते २० जणांनी पुन्हा वस्तीत प्रवेश करत हाणामाऱ्या सुरू केल्या. यावेळी शरद वाघ यांच्यावर वार करत असताना त्यांची मेहुणी लक्ष्मी (वय २० रा. न्यायडोंगरी ता. नांदगाव) ही सोडवण्यासाठी मध्ये पडली. मात्र, तिच्या वर्मी वार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ह्या टोळक्याने यावेळी शरद महादू वाघ, शंकर ज्ञानेश्वर वाघ, अलका संजू वाघ ह्या तीन कुटुंबाची घरे जाळून टाकली. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. घोटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपासकार्य सुरू केले आहे. दोन्ही गट आदिवासी समाजाचे असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e