रावेर तालुक्यातील सातपुडा पट्ट्यातील अहिरवाडी गावाच्या शेती शिवारात मंगळवारी (ता. ३१) दुपारी चार ते साडेचारच्या सुमाराला मोठा वादळी पाऊस झाला. यात हवेच्या जोरदार प्रवाहाने ऐन कापणीला आलेल्या केळीच्या अनेक बागा भुईसपाट झाल्या. कापणीला आलेली केळी भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. संजय चौधरी, टी. पी. पाटील, गोपाळ धनगर, अनिल चौधरी, दिगंबर राजपूत, प्रशांत पाटील आदी शेतकऱ्यांची केळी पूर्ण आडवी पडली आहे. कुंभारखेडा -उतखेडा व चिनावल- उतखेडा या रस्त्यावर मोठी झाडे पडल्याने तेथील वाहतूक काही काळ बंद झाली होती.
युवक जखमी
वादळी वाऱ्यामुळे प्रशांत कौतिक सावळे (वय २८, रा. अहिरवाडी) या युवकाच्या अंगावर झाड कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला आहे. त्याच्यावर रावेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच कुंभारखेडा येथील माध्यमिक शाळेवरील पत्रे वादळी पावसामुळे उडून गेले आहेत.
अहिरवाडीत सर्वाधिक नुकसान
अहिरवाडी - पाडळा रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या सर्वच केळी बागांचे सुमारे २२५ ते २५० शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. जिथपर्यंत नजर पोहचेल तिथपर्यंतच्या उभ्या केळी बागा आडव्या झाल्याचे चित्र आहे. मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी वृत्त कळताच तातडीने अहिरवाडी, पाडळा परिसरात शेतकऱ्याची भेट घेऊन नुकसानीची माहिती घेतली.
0 Comments