राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात आले होते. त्यापूर्वी भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन आले होते. महाजन खालच्या मजल्यावर उभे असताना एकनाथ खडसे व त्यांच्या समर्थकांचा ताफा विधानभवनाच्या वास्तूत प्रवेश करीत होता. 'नाथाभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है', अशा घोषणा सुरू होत्या. खडसे येत असल्याचे पाहून महाजन यांनी त्यांना वाट मोकळी करून दिली. महाजन तेथे असल्याचे खडसे यांना माहीत नव्हते. थोडे पुढे गेल्यावर रोहिणी खडसे यांनी गिरीश महाजन समोर असल्याचे एकनाथ खडसे यांच्या निदर्शनास आणून दिले.
गिरीश महाजन वळताच खडसे व त्यांची नजरानजर झाली. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले. यानंतर महाजन पुढे चालत गेले. त्यांनी हाथ जोडून खडसे यांना नमस्कार केला. तसेच हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. उभयतांनी हातात हात मिळविला. नंतर खडसे यांनी महाजन यांच्या खांद्यावर हात ठेवला. खडसे आनंदी मूडमध्ये होते. उभयतांनी अल्पसे हितगुज केले. महाजन यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे स्मितहास्य होते, तर खडसेसुद्धा तणावमुक्त दिसत होते.
0 Comments