नवी दिल्ली : काँग्रेसचे मुखपत्र ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ‘यंग इंडियन’ कंपनीचे प्रमुख समभागधारक
राहुल गांधी यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने दहा तास चौकशी केली. त्यापूर्वी, काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राहुल यांची मंगळवारीही चौकशी होणार आहे.
नॅशनल हेराल्ड’ची मूळ कंपनी ‘असोसिएट जर्नल’ आणि ‘यंग इंडियन’ कंपनीतील आर्थिक व्यवहारासंदर्भात ‘ईडी’च्या चार अधिकाऱ्यांच्या चमूने राहुल गांधी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. राहुल गांधी यांची ही चौकशी दोन टप्प्यांमध्ये झाली. सकाळच्या सत्रात साडेअकराच्या सुमारास ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी राहुल यांचा जबाब नोंदवण्यास सुरूवात केली. तीन तास चौकशी झाल्यानंतर भोजनासाठी मध्यंतर झाले आणि त्यानंतर दुपारच्या सत्रातही राहुल गांधी यांचे जबाव नोंदवले गेले. बहुतांश प्रश्नांना राहुल गांधी यांनी हो-नाही एवढीच उत्तरे दिली. अनेक प्रश्नांसंदर्भात माहिती नसल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे कळते.
सकाळच्या सत्रातील चौकशीनंतर झालेल्या मध्यंतरामध्ये राहुल गांधी यांनी तुघलक रोड पोलीस ठाण्याला भेट दिली. के. सी. वेणुगोपाल, ओमान चंडी, रणदीप सुरजेवाला, दिग्विजय सिंह, नासीर हुसैन आदी वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर तुलघल रोड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. प्रियंका गांधी तिथे होत्या. काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची गंगाराम रुग्णालयामध्ये भेट घेतली. ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी सोनिया गांधी यांचीही ‘ईडी’ चौकशी करणार आहे. मात्र, करोनाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे सोनिया यांना गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘ईडी’ने त्यांना २३ जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, पवन बन्सल आदी नेत्यांचीही चौकशी झाली आहे.
असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ कंपनीला कर्जमुक्त करण्यासाठी ‘यंग इंडियन’ कंपनी स्थापन करून ९० कोटी देण्यात आले. हे ९० कोटी काँग्रेसने ‘यंग इंडियन’ला दिले होते. यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार २०१३ मध्ये भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. या प्रकरणात राहुल व सोनिया गांधी यांना जामीन मिळाला आहे.
काँग्रेसच्या पदयात्रेवर निर्बंध
देशात धार्मिक मुद्दय़ावरून तणाव असल्याने दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या पदयात्रेला वा मोर्चाला परवानगी नाकारली आणि जमावबंदी लागू केली. राहुल गांधी हे ‘ईडी’ कार्यालयात पोहोचण्याआधी सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून काँग्रेसने अत्यंत नाटय़मय शक्तिप्रदर्शन केले. राहुल गांधी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एक किमीची पदयात्रा काढतील व नंतर ईडीच्या कार्यालयाकडे रवाना होतील असे काँग्रेसने आधीच जाहीर केले होते. काँग्रेसच्या खासदारांना तसेच,
कार्यकर्त्यांना सोमवारी सकाळी अकबर रोडवरील मुख्यालयात जमण्यास सांगण्यात आले होते. काँग्रेस श्रेष्ठींच्या आदेशानुसार हजारो कार्यकर्ते मुख्यालयात जमले होते. मात्र, अकबर रोड तसेच, ईडीचे कार्यालय असलेल्या अब्दुल कलाम रोडवर निमलष्करी दल तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. काँग्रेसच्या मुख्यालयातून राहुल गांधी यांनी पोलिसांच्या तीनस्तरीय सुरक्षेचे कडे मोडून पदयात्रा काढली. पण, काही अंतरावर पोलिसांनी राहुल आणि अन्य नेत्यांना अडवले. या पदयात्रेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही सहभागी झाले होते. नंतर राहुल गांधी ईडीच्या मुख्यालयात गेले. प्रियंका गांधीही त्यांच्याबरोबर होत्या. दिग्विजय सिंह वगैरे नेत्यांनी मुख्यालयापासून काही अंतरावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले
0 Comments