यवतमाळ : घरकूल योजनेचा निधी आणि रोहयोच्या कामावरील मजुरी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या दोन महिलांसह एका व्यक्तीने यवतमाळ येथील गटविकास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले. ही घटना आज, मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पंचायत समितीमध्ये घडली. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
केशव गड्डापोड, असे काळे फासण्यात आलेल्या गटविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी सोमवारीच प्रभारी गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्याकडून गटविकास अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. आज दुपारी विभागप्रमुखांची आढावा बैठक सुरू असताना वाटखेड येथील दिगांबर अवथळे हा काही महिलांना घेऊन थेट गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षात शिरला. घरकूल हप्त्यासह रोहयोचे पैसे मिळत नसल्याचा आरोप करीत अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. यावेळी त्याच्यासोबत आलेल्या दोन महिलांनी गटविकास अधिकारी गड्डापोड यांच्या चेहऱ्याला काळे फासले. उपस्थित अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तत्काळ अवधूतवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अवथळे याच्यासह दोन महिलांना ताब्यात घेतले. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
0 Comments