बैल कधीच एकटा येत नाय, जोडीनं येतो', फडणवीसांनी मुळशी पॅटर्नचा डायलॉग ऐकवला!

पिंपरी-चिंचवड: देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही पिंपरी-चिंचवडमधील टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर पार पडली. आज या शर्यतीचा समारोप कार्यक्रम होता. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बक्षीस वितरण समारंभासाठी बोलावण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत असताना त्यांनी त्यांचा पोशाख, त्याला लागलेली झूल आणि मुळशी पॅटर्नचा डायलॉग ऐकवला.
देवा, हिरा, शंभू, पक्षा, लेझर, मंगुळा, बादल, सर्ज्या, बाल्या, सोन्या.... अशी तिथल्या शर्यतीत सहभागी झालेल्या बैलांची नावं घेत फडणवीसांनी आपल्या भाषणाची सुरूवाती केली. या बैलांना त्यांनी स्टार म्हणून संबोधलं. तसेच, शर्यतीतला उत्साह पाहून मला आनंद होत आहे, असं फडणवीस म्हणाले.
म्हणून मला झूल घालून आणलं - फडणवीस

आज देवेंद्र फडणवीसांनी नेहमीपेक्षा जरा वेगळा पोशाख घातला होता. त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, "बैलगाडा शर्यतीत बैलाला धावावं लागतं, म्हणून त्याला झूल घालता येत नाही. म्हणून मुख्य अतिथीला झूल घालून भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी कार्यक्रमात आणलं आहे. हा ड्रेस त्यांनीच मला शिवून दिला. हा पोशाख घालूनच या कार्यक्रमात यावं लागेल असं सांगितलं, म्हणून मी हा पोशाख घातला, असं फडणवीस म्हणाले
फडणवीसांनी मुळशी पॅटर्नचा डायलॉग ऐकवला

"काही लोक मला म्हणाले की, आज तुम्ही आणि महेश लांडगे सारखेच दिसत आहात. मी त्यांना सांगितलं की, मुळशी पॅटर्न पाहिलाय का? तर ते म्हणे पाहिला. मग त्यात काय म्हटलंय, बैल कधीही एकटा येत नाय, तो जोडीनं येतो आणि सोबत नांगर घेऊन येतो. त्यामुळे नांगर कोणाकरता जो बैलगाड्याला विरोध करतो त्याकरिता", असं म्हणत त्यांनी मुळशी पॅटर्न सिनेमातील डायलॉग ऐकवला.
पुढे ते म्हणाले, "आज हा आनंद आहे की या ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील नाही तर देशातील सर्वात मोठी शर्यत महेश लांडगेंनी सुरू केली. त्याबाबत त्यांचं मी अभिनंदन करतो. महेश दादांनी मला श्रेय दिलं, पण हे माझं श्रेय नाही, हे त्यांचंच श्रेय आहे. त्यांनी आणि अखील भारतीय बैलगाडा परिषदेने या ठिकाणी जी काही मेहनत घेतली, त्यामुळेच बैलगाडा शर्यत सुरू होऊ शकली", असं म्हणत त्यांनी आमदार महेश लांडगे यांचं कौतुक केलं.
देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही पिंपरी-चिंचवडमधील टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर भरवण्यात आली होती. २८ ते ३१ मे २०२२ या चार दिवस ही शर्यत झाली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e