आईच्या हट्टाने दोन्ही लेकींना जीवदान; बस अपघाताची बातमी समजताच डोळ्यातून अश्रूधारा

अमळनेर (जळगाव) : आपण नेहमीच मोठ्यांकडे हट्ट करतो व तो बाल हट्ट मोठे व्यक्ती नेहमीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे म्हातारपण एकप्रकारे बालपणच आहे. हाच धागा पकडत इंदूर येथील रहिवासी असलेल्या आजारी वृद्ध आई शांताबाई सूर्यवंशी (वय ७८) यांनी आपल्या आपल्या दोन्ही लेकी अनिता लक्ष्मण पाटील (वय ५०,  व संगीता सुरेश पाटील (वय ४५, गंगापुरी, ता. अमळनेर) यांना अजून एक दिवस राहण्याचा हट्ट केला अन्‌ त्या दोघींना जाण्याचा बेत रद्द केला. कारण हाच हट्ट अखेर त्यांना जीवदान देणारा ठरला. कारण दोन्ही सख्ख्या बहिणी त्याच अपघातग्रस्त बसने अमळनेरला येणार होत्या.
आमोदा  येथील मूळ रहिवासी असलेले निवृत्त पोलिस उपनिरीक्षक देविदास वामन सूर्यवंशी (वय ८३) आपल्या तिन्ही भाऊ व मुलासमवेत इंदूर येथेच स्थायिक झाले आहेत. त्यांच्या पत्नी शांताबाई सूर्यवंशी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना पाहण्यासाठी व तब्येतीची विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्रातून दोन्ही लेकी गेल्या आठवड्यात इंदूरला गेल्या होत्या.

रडावे की हसावे..असेच चित्र

‘मातृसेवा’ केल्यानंतर त्या दोन्ही बहिणी अपघातग्रस्त बसने अमळनेरला येणार होत्या. मात्र, त्याच वेळेस वृद्ध आईने ‘एक दिवस तरी थांबा’, असा हट्ट धरला. त्यानंतर अनिता पाटील यांनी आपले पती निवृत्त शिक्षक एल. एस. पाटील (रा. आदर्शनगर, अमळनेर) यांना भ्रमणध्वनी वरून येण्याचा बेत रद्द झाल्याचे सांगितले. जेव्हा काही तासांतच इंदूर- अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळल्याची बातमी दोघींकडे गेली. त्यावेळेस सर्वांचाच हृदयाचा ठेका चुकला. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. रडावे की हसावे, असा प्रश्न त्यावेळेस दोन्ही लेकींसह वृद्ध मातापित्यांना पडला होता. जीवनाची दोरी बळकट असली, की ‘यम’ही आपले काही बिघडू शकत नाही. जणू काही वृद्ध आईने आपल्या दोन्ही लेकींसाठी परमेश्वराकडून जीवदान मागून घेतले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e