मिळालेल्या माहितीनुसार, घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावात तान्हाजी शिंदे यांचे रुग्णालय आहे. गेल्या चार वर्षापासुन बीएचएमएस डॉक्टर असलेले तानाजी शिंदे हे रुग्णावर उपचार करतात. दरम्यान गावातील विशाल दत्ता जाधव हा दारूच्या नशेत आठ दिवसापूर्वी त्यांच्याकडे उपचारासाठी आला होता.तो दारूच्या नशेत अश्लील भाषांचा वापर करून शिवीगाळ करत असल्याने शिंदे यांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला.
त्यातच रात्री उशीर झाला असल्याने शिंदे हे रुग्णालय बंद करून घरी निघून गेले. दरम्यान, विशाल हा 8 दिवसानंतर पुन्हा रविवारी सायंकाळी शिंदे यांच्या रुग्णालयात आला. माझ्यावर उपचार का नाही केले असं म्हणत विशालने शिंदे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी शिंदे यांनी रुग्णालय बंद केले आणि ते घरी निघून गेले.
दरम्यान, शिंदे घरी जाताच विशाल याने बाटलीत आणलेले पेट्रोल टाकून रुग्णालय पेटवून दिलं आणि घटनास्थळावरून पळून गेला. विशाल याने रुग्णालय पेटून दिल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी डॉ. शिंदे यांना दिली. माहिती मिळताच शिंदे यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
मात्र तोपर्यंत रुग्णालयातील साहित्य औषधी पूर्णपणे जळून खाक झाले होते. याप्रकरणी डॉ.शिंदे यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात विशाल दत्ता जाधवर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास घनसावंगी पोलिस करत आहे.
0 Comments