मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील सुंदर नगर परिसरातील ब्ल्यू होरायझन इमारतीच्या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने घरकाम करणाऱ्या महिलेला विसाव्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी महिला आठव्या मजल्यावर अडकली होती. त्यानंतर तिला अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलिसांनी वाचविले. सध्या या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घरकाम करणारी महिला ब्ल्यू होरायझन इमारतीमध्ये कामासाठी गेली होती. तिचे ए आणि बी विंग मधले काम आटपले. पुन्हा एका कामासाठी त्या ए विंगमध्ये निघाली. तेव्हा बी विंगचा सुरक्षारक्षक असलेल्या सिंग याने त्यांना थांबवत ए विंगच्या विसाव्या मजल्यावर फ्लॅट २००१ मध्ये नवीन मॅडम रहायला आली आहे. त्यांच्या कडे धुणीभांडी करण्याचे काम आहे असे सांगितले. त्यानुसार ती त्याच्या सोबत लिफ्टने २० व्या मजल्याच्या फ्लॅटकडे जाण्यासाठी निघाली. एका दिवसाचे काम आहे आणि ती त्यासाठी तुला ३ हजार रुपये देईल, असे सिंगने महिलेला सांगितले. त्यावर 'मला फिक्स काम हवे आहे', असे उत्तर तिने दिल्यावर तू स्वतः बोलून घे, असा सल्ला सिंगने महिलेला सांगितले
विसाव्या मजल्यावर पोहोचताच सिंग याने मॅडमला फोन केला आणि त्यांना येण्यास अर्धा तास लागणार असून गच्चीवर त्यांनी त्यांच्या लहान मुलाचे कपडे ठेवले आहेत, ते महिलेला घेऊन जाण्यास सांगितल्याचे सिंगने महिलेला सांगितले. तेव्हा महिला गच्चीच्या दिशेने वळली आणि सिंगने मागून तिचा गळा आवळत तिला खाली पाडले. त्यात तिच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर सिंगने थेट तिला उचलून विसाव्या मजल्याच्या गच्चीवरून खाली फेकून दिले आणि पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे.
0 Comments