महिलांना गंडा घालणारा राहुल गोसावी हा भोंदू आहे एवढेच पोलिस पथकाला माहिती होते. एवढ्या माहितीवर त्याला पकडण्याचे आव्हान धुळे शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. नितीन देशमुख व त्यांच्या पथकाने स्विकारले. त्याचा मोबाईल क्रमांक मिळवल्यानंतर त्याचे लोकेशन घेण्यात आले. तो जळगावला असल्याची माहिती पो.नि. नितीन देशमुख व त्यांच्या सहका-यांना समजली. या माहितीच्या आधारे पोलिस कर्मचारी नीलेश पोतदार, मनिष सोनगीरे, प्रवीण पाटील, कुंदन पटाईत यांच्या पथकाने जळगाव शहर गाठले. मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागल्याने त्याने मोबाईल क्रमांक काही वेळासाठी बंद करुन ठेवला. सायंकाळी त्याचा मोबाईल सुरु झाल्यानंतर पोलिस पथकाने त्याला फोन लावून आपण त्याचे भक्त असल्याचे सांगितले.
बाबा आम्ही खुप अडचणीत असून आज दिप अमावस्या आहे. बाबा नमस्कार ……आम्हाला स्मशान जागं करायच असून तुमची साथ हवी आहे अशी सुरुवात करुन त्याला साद घालण्यात आली. नंदुरबारच्या बाबांनी तुमचा नंबर दिला. मी अनेक अडचणीत आहे. स्माशन जाग करण्यासाठी किती पैसे घ्याल अशी भोंदूला विचारणा करण्यात आली. पलीकडून भोंदूने चाळीस हजार रुपयांचा आकडा सांगितला. त्यानंतर भेटीचे नियोजन करण्यात आले. एम.जे.कॉलेज परिसरात भेटण्यासाठी भोंदू येणार असल्यामुळे तेथे सापळा लावण्यात आला. या सापळ्यात भोंदू राहुल गोसावी अडकला. त्याला अटक करण्यात आली. या फसवणूकीच्या प्रकरणात अजून एका साथीदाराचा सहभाग असल्याचे उघड झाले. राहूल हा धुळे शहरातील रहिवासी असून त्याचा साथीदार मुंबई येथील आहे.
0 Comments