राज्यातील आणि परराज्यातील अनेक नेत्यांनी वापरलेले हेलिकाप्टर सीबीआयने जप्त केलं आहे. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे हे हेलिकाप्टर आहे. तब्बल 34 हजार कोटी रुपयांच्या डीएचएफल घोटाळ्यातील आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. या घोटाळ्यात भोसले यांचा सहभाग आढळल्याने पुण्यातील बाणेर येथून त्यांचं हेलिकॉप्टर जप्त करण्यात आलं आहे. विमानतळावर असलेल्या हँगरप्रमाणे एका मोठ्या हॉलमध्ये हे हेलिकाप्टर दडवून ठेवण्यात आलं होतं. ते सीबीआयने शोधून काढलं.
या घोटाळ्यातून या आरोपींनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता आरोपींनी खरेदी केल्या. सीबीआय घोटाळ्यासंबंधित मालमत्तांचा शोध घेत आहे. या आधी ईडीने भोसले यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयाचा ताबा घेतला आहे. भोसले यांचे हे हेलिकाप्टर ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांना हे हेलिकाप्टर सहज उपलब्ध होत होते. अनेकांनी भोसले यांच्या हेलिकॉप्टरची सेवा घेतली आहे.
डीएचएफएलचे माजी प्रमुख कपिल वाधवान, दीपक वाधवान यांच्याविरोधात सीबीआयने 20 जून रोजी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्यावर 17 बँकांचे एकून 34 हजार 615 कोटी रुपये बुडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बँकांकडून कर्ज म्हणून मिळालेली रक्कम अनेक शेल कंपन्यांत गुंतविण्यात आल्याचा आरोप आहे. डीएचएफएलने अनेकांना बोगस कर्जे दिल्याचे आरोपपत्रात म्हटलं आहे. या आधी वाधवान यांच्या महाबळेश्वर येथील निवासस्थानातून सुमारे एक कोटी रुपयांची 25 अलिशान घड्याळे आणि 38 कोटी रुपयांची पेंटिंग्स जप्त करण्यात आली आहेत.
0 Comments