नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी
शहरातील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दुध डेअरीजवळ कुंटणखाना चालविणार्या दोन महिलांसह 10 पिडीत महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
शहरातील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दुध डेअरीजवळ दोन महिला इतर काही पिडीत महिलांकडून पैसे घेवून त्यांच्याकडून अनैतिक व्यापार करुन घेवून गैरकायदेशीर कुंटणखाना चालवित आहेत, त्यामुळे परिसरात असलेल्या शाळा/महाविद्यालयातील मुलेमुलींवर वाईट परिणाम होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना प्राप्त झाली.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.त्याअनुषंगाने श्री.कळमकर यांनी 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरातील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या जुन्या दुध डेअरीजवळ सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापे टाकले. पथकाने बातमीची अधिक खात्री करण्यासाठी एक पंटर ग्राहकास सदर ठिकाणी पाठविले.
पंटर ग्राहक यांनी सदर ठिकाणी असलेल्या दोन महिलांशी बोलणी करुन त्या महिलांना रोख रक्कम दिली. त्यानंतर पथकाने सायंकाळी 6.30 वाजता छापा टाकून कुंटणखाना चालविणार्या दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले. तसेच सदर ठिकाणी असलेल्या रुमची पाहणी केली असता त्याठिकाणी 4 बाय 6 आकाराचे काही लहान लहान रुम दिसून आले. त्या रुमची पाहणी केली असता तेथे वेगवेगळ्या राज्यांमधून पैसे घेवून अनैतिक व्यापार करण्यासाठी आणलेल्या 10 पिडीत महिला मिळून आल्या.
कुंटणखाना चालविणार्या दोन महिला आरोपी वेगवेगळ्या राज्यांमधून पिडीत महिलांकडून पैसे घेवून त्यांना अनैतिक व्यापार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन त्यांच्याकडून उपजिविका भागवित असतांना मिळून आल्याने कुंटणखाना चालविणार्या दोन महिला आरोपीविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 पिडीत महिलांची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे करुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना सखी वन स्टॉफ सेंटर, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे तात्पुरत्या निवार्यासाठी दाखल करण्यात आलेले आहे.
कुंटणखाना चालविणार्या दोन महिला आरोपी व वेगवेगळ्या राज्यांमधून अनैतिक व्यापार करण्यासाठी आणलेल्या 10 पिडीत महिलांची जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालयाचे आदेशान्वये 10 पिडीत महिलांना धुळे येथील ममता महिला गृह येथे पाठविण्यात येणार आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महिला सेलचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील परिविक्षा अधिकारी श्रीमती सुरेखा पवार व संरक्षण अधिकारी रविंद्र काकळीज, पोह दिपक गोरे, राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, महेंद्र नगराळे, पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, जितेंद्र ठाकुर, सुनिल पाडवी, पोलीस शिपाई शोएब शेख, विजय ढिवरे, अभय राजपूत, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण, महिला सेल येथील महिला पोलीस हवालदार विजया बोराडे, प्रिती गावीत, अरुणा मावची, जिल्हा विशेष शाखेचे महिला पोलीस नाईक पुष्पा वळवी, सुरेखा पाडवी तसेच पोलस मुख्यालय येथील सहा.पोलीस उप निरीक्षक सलीमोद्दीन काझी, महिला पोलीस अमंलदार कावेरी साबळे यांच्या पथकाने केली.
0 Comments