अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना अल्पावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून, एका कंपनीत सुमारे 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत संगमनेरातील तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती, कोंची, पो. निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग (दोघेही रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे तीनही आरोपी करुणा मुंडेंनी काढलेल्या नव्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
या बाबत करुणा मुंडे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार (26 ऑगस्ट) रात्री दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संगमनेर मधील या तिघांनी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या ओळखीतून, त्यांची पत्नी करुणा मुंडे यांचा विश्वास संपादन करीत, त्यांना लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीबाबत माहिती दिली.
या कंपनीत 30 लाखांची आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा 45 ते 70 हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच यापेक्षा अधिक प्रमाणात नफा मिळाल्यास त्या प्रमाणात अधिक नफा देण्यात येणार असल्याचे सांगितले.या बोलण्याला भुलून करुणा यांनी 7 जानेवारी 2022 पासून दहा दिवसांत रोख व धनादेशाच्या स्वरुपात त्यांना 30 लाख रुपये दिले.
गुंतवणूकीनंतर मात्र या तिघांनी कोणतीही अधिक माहिती व नफा न देता फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची खात्री पटावी यासाठी 45 हजार रुपये परतावा दिला. त्यानंतर मात्र फोन न घेणे किंवा विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देणे असे प्रकार सुरु झाले. तसेच मुंडे यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व समाजात बदनामी कऱण्याची धमकी दिली.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे समजताच करुणा मुंडे यांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून योग्य त्या पुराव्यांसह फिर्याद दाखल केली. त्यानुसार तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
0 Comments