आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न त्यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत' असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
हे सरकार कोसळणारच असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते, त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की 'हे सरकार शिवसेना व भाजप युतीच सरकार आहे. याकडे त्यांनी त्याच दृष्टीने बघावं. शिंदे गटात जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र त्यावेळी त्यांनी त्याची दखल घेतली असती तर आज वेळ ही आली नसती'. असं गुलाबराव पाटील म्हणाले.
सर्वात आधी मी गेलो नाही, 32 आमदार गेल्यानंतर मी शिंदे गटात सहभागी झालो . मी एकटा नाही तर मी २० आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. मात्र त्यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे शिवाजी महाराज तह करायचे तसा तह केला असता, तर ही वेळ आली नसती'. असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.
'आदित्य ठाकरे हे तरुण होते त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने राज्यभर दौरे करायला हवे होते, अशी आमची अपेक्षा होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही. मात्र आमची त्यावेळची इच्छा अपेक्षा आदित्य ठाकरे आता पूर्ण करत आहेत त्यामुळे देव त्यांचं भलं करो' असा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
'जे शिवसेना संपवायला निघाले आहेत त्यांच्यासोबतच शिंदे गटाने युती केली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सभेत केली होती. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी मत व्यक्त केलं. एकनाथ खडसेंनी भाजप आणि शिवसेनेची युती तोडली होती. त्या एकनाथ खडसेसोबत तुम्ही बसले.आणि आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत युती केली तर आम्ही गद्दार काय...? नाही आम्ही खुद्दारच आहोत' असं उत्तरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिलंय.
0 Comments