पातोंडा (जळगाव) : येथून जवळ असलेल्या गॅस एजन्सीजवळ १५ ऑगस्टला दुपारच्या सुमारास बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात बहिणीला रक्षाबंधनासाठी भेटायाला जाणारा टोळी (ता. पारोळा) येथील तरुण मनोज युवराज पाटील (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला
टोळी येथील मनोज पाटील हा सावखेडा येथे आपल्या बहिणीला भेटायला येत असताना गॅस एजन्सीजवळ इगतपुरी आगाराची चोपडा- नाशिक बसने (एमएच ४०, वाय ५९७७) अमळनेरकडे जाताना समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच १९, डीजी ९०४५) जोरदार धडक दिली. यात मनोज पाटील हा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल्यानंतर विच्छेदनासाठी मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. चोपडा -नाशिक बसचे चालक गोकुळ दौलत चौधरी (रा. मालेगाव) अमळनेर पोलिस ठाण्यात जमा झाला असून, पोलिस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील तपास करीत आहेत.
दोन बहिणींचा एकुलता भाऊ
मनोज पाटील हा एकुलता एक मुलगा व दोन बहिणींचा लाडका भाऊ होता. रक्षाबंधनानिमित्त बहिणीला भेटायला येत असताना मला नवीन कपडे घेऊन दे, असा दूरध्वनीवरून आग्रह धरला होता. परंतु बहिणीचे गाव अवघ्या तीन किलोमीटरवर असतानाच काळाने डाव साधला. मनोजचे आई, वडील मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मनोज हा आपल्या कुटुंबाचा कमावता आधार होता. मनोजच्या निधनाची बातमी कळताच टोळी गावावर शोककळा पसरली. पातोंडा गावाजवळ अपघात झाल्याचे कळताच गावातील तरूण समाधान पाटील, रत्नाकर पवार, सोपान लोहार, महेंद्र पाटील, केतन ढिवरे, मंगेश पवार व तरुणांनी धाव घेत सहकार्य केले. समाधान पाटील याने अमळनेर पोलिस ठाण्यात व टोळी येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.

0 Comments