यावल (जळगाव) : तालुक्यातील चितोडा येथील तरुणाच्या हत्येपाठोपाठ येथे शहरात पुन्हा एका महिलेचा शनिवारी (ता. २७) सायंकाळी खून झाला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चार संशयिताना अटक करण्यात आली असून, ते पोलिस कोठडीत आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज पुन्हा एकदा तालुक्यात येथे शहरात महिलेचा खून झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
यावल शहरातील काझीपुरा परिसरात आज सायंकाळी साडेसातला नाजिया खलिल काझी (वय ३५, रा. काझीपुरा, यावल) या महिलेवर संशयित जावेद युनूस पटेल याने कुऱ्हाडीने हल्ला केला. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील एका घटनेत संबंधित मृत महिलेने फैजपूर येथील काही तरुणांच्या मदतीने जावेद पटेल या तरुणावर हल्ला केला होता. याच घटनेचा वचपा काढणेसाठी या घटनेची पुनरावृत्ती घडली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली. शहरात ही खबर वाऱ्यासारखी पसरताच परिसर हादरला आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषित केले आहे.
कुऱ्हाडीसह पोलिस ठाण्यात
यात जावेद पटेल या संशयिताने स्वतः कुऱ्हाडीसह पोलिस ठाण्यात हजर झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली आहे. श्वानपथकास पाचारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
0 Comments