
विरार : वसई-विरार महापालिकेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात एक मृतदेह तब्बल १३ तास इतर रुग्णांसह सर्वसामान्य कक्षात ठेवण्यात आला होता. या मृतदेहामुळे इतर रुग्णांना डास व माश्यांचा त्रास होऊ लागल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पालिका रुग्णालय आणि पोलिसांनी एकमेकांवर खापर फोडले आहे.
शुक्रवारी वसईच्या रस्त्यावर एक ७० वर्षीय बेवारस इसम बेशुद्धावस्थेत पडला होता. याबाबत स्थानिकांनी या व्यक्तीला सर डी एम पेटिट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या वेळी रुग्णालयातील सर्वसाधारण कक्षात इतर रुग्ण उपचार घेत होते. या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने त्याचा मृतदेह हलवला नव्हता. हा मृतदेह तसाच १३ तासांहून अधिक काळ ठेवण्यात आला होता. या मृतदेहाला माश्या लागल्या होत्या आणि त्याची दुर्गंधी येऊ लागली. याच मृतदेहाशेजारील खाटेवर उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाला हा प्रकार समजताच त्याने रुग्णालयाला याबाबत विचारणा केली. रुग्णालयातील डॉक्टराने पोलीस पंचनामा बाकी असल्याचे सांगितले.
पोलीस वेळेवर पंचनाम्यासाठी आले नसल्याने हा मृतदेह ठेवल्याचा खुलासा रुग्णालयाने केला आहे. तर पोलिसांनी रुग्णालयातील ढिसाळ यंत्रणेवर बोट ठेवत पोलीस दोन वेळा जाऊनही पालिकेच्या रुग्णवाहिकेचा चालक जाग्यावर नसल्याने पोलिसांना परत पाठवले असे सांगितले. नातेवाईकाने समाजमाध्यमांवर चित्रफीत व्हायरल करताच अवघ्या काही मिनिटांत हा मृतदेह हलविण्यात आला. या प्रकारावरून इतर रुग्णांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सदरच्या इसमाला क्षयरोगाने ग्रासले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलीस पंचनाम्याशिवाय मृतदेह हलवता येणार नव्हता. त्यात रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास उशीर लागला. यामुळे मृतदेह झाकून ठेवण्यात आला होता. तर पोलिसांनी दोन वेळा रुग्णालयास भेट दिली होती, पण रुग्णवाहिकेचा चालक बेपत्ता होता. यामुळे पोलिसांना परत पाठवण्यात आले होते. -डॉ. राणी बदलानी, वैद्यकीय अधिकारी.
0 Comments