जळगावात हत्यासत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एक खूनाची घटना घडली होती. यावल तालुक्यातील चितोडा येथे ही घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकाचा खून करण्यात आला आहे. जळगावातील या हत्यासत्रामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
वाळूमाफियांच्या वादातून जळगावातील एसएमआयटी महाविद्यालयाजवळ एकाचा खून करण्यात आला आहे. भावेश उत्तम पाटील, असे मृताचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यात दर आठवड्याला खून होत आहे. किरकोळ वादातून हे खून होत असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसापूर्वी यावल तालुक्यातील चितोडा गावी उधारीच्या पैशातून एका तरुणाचा मध्यरात्री खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता यावलनंतर जळगावात देखील खून झाला आहे.
मध्यरात्री भरवस्तीत भर रस्त्यावर हा खून झाला आहे. भावेश उत्तम पाटील (वय-30, रा.आव्हाणे, हल्ली मुक्काम निवृत्तीनगर) असे मृताचे नाव आहे. रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयासमोरील 100 फुटी रस्त्यावर या तरुणावर चाकूने सपासप वार करुन त्याचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर संशयित आरोपी यांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू आहे. तसेच पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. तर या प्रकरणातील संशयित आरोपी हे वाळूमाफिया असून वाळू व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात ही घटना घडली. मोबाईलच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अक्षय असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय हा त्याच्या मित्रांसह घराजवळ गप्पा मारत होता. याचवेळी तीन ते चार जण दुचाकीवरून आले आणि त्याला काही काम आहे, असं सांगून सोबत घेऊन गेले.
यानंतर शिवकॉलनीतील देशी दारूच्या दुकानावर अक्षय याचा बाळू पवार नावाच्या तरुणासोबत वाद झाला. या वादातून अक्षयने बाळूच्या भावाला दगड मारुन फेकला. याचा राग आल्याने बाळूने अक्षयच्या पोटात चॉपरने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले. यावेळी भांडणादरम्यान, अक्षयच्या सोबत असलेला त्याचा मित्र युवराज मोतीलाल जाधव हा या भांडणात पडला होता. मात्र, त्यालासुद्धा मारहाण करत जखमी केले आहे. यानंतर त्याचा मृत्यू झाला.
0 Comments