साबीर लियाकत खान (२५), अन्सार सुले खान (२६) इरफान शकुर शेख (३७), हाकाम शेर महम्मद शेख (२७) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या टोळीतील दोन चोरटे अद्यापही फरार आहेत. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी २९ ऑगस्ट रोजी चोरीच्या वाहनांचा वापर करुन वायगाव येथील एसबीआय कंपनीचे एटीएम मशीन गॅस कटरने कापून तब्बल २३ लाख रुपये लंपास केले. तसेच या चोरट्यांनी बोरगावातही एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करुन चोरटे पसार झाले होते. देवळी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत सदर आरोपी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जीवाची पर्वा न करता निजामाबाद जवळील खेडला नुहू मेवात ढाब्यावर छापा मारुन चारही आरोपींना अटक केली, अशी माहिती वर्ध्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ८ हजार ५०० रुपये रोख, चार मोबाईल, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी फायटर, तीन एटीएम कार्ड, दिल्ली पासींग वाहनांच्या दोन फेक नंबर प्लेट, वाहन डायरेक्ट करण्याची दोन हत्यारे, पांढऱ्या रंगाची कार असा एकूण ८ लाख ६९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले आरोपी एटीएम कटींग करणारे अट्टल गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र हरियाणा आदी राज्यात गुन्हे केले आहेत. सध्या हे सर्व आरोपी दिल्ली, पानिपत येथील एटीएम कटिंगच्या गुन्ह्यात फरार आहेत. यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशीही माहिती होळकर यांनी दिली आहे.
0 Comments