जळगावातील शिवाजीनगर परिसरातील मिथिला सोसायटीमधील मुलांनी रविवारी (ता. ११) एकत्र येत पिकनिकचा बेत आखला होता. समवयस्क मित्र- मैत्रिणी दर सुटीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जात असतात. पालकांच्याच परवानगीने रविवारी १० ते १५ जणांचा ग्रुप कांताई बंधाऱ्याजवळील नागाई- जोगाई मंदिराजवळील गिरणा नदीपात्रावर पिकनिकला आले होते. या वेळी खडकावर उभे राहून योगिता दामू पाटील (वय २०) व समीक्षा विपिन शिरोडकर (वय १८) फोटोसेशन करीत होत्या. सेल्फी घेत असताना दोघी पाण्याच्या प्रवाहात कोसळल्या. त्यांना वाचविण्यासाठी योगिताचा लहान भाऊ सागर व सोबतच्या इतरांसह नयन योगेश निंबाळकर यांनी उड्या घेतल्या. योगिता व समीक्षा यांना बाहेर काढल्यावर सागरलाही वाचविण्यात आले. मात्र, नयन निंबाळकर पाण्याच्या प्रवाहात ओढला गेल्याने तो वाहून गेला. नयनचे वडील दूध फेडरेशन येथे नोकरीला असून, आई गृहिणी आहे.
पालक, पोलिसांची धाव
घडल्या प्रकाराची माहिती या मुलांसोबतच्या मित्रांनी त्यांच्या घरी कळविल्यावर पालकांसह तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समीक्षा, योगिता व सागर या तिघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघी मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असून, सागरही रात्रीपर्यंत नॉर्मल होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
0 Comments