वीज बिलातील लोड दुरुस्ती करुन देण्यासाठी महावितरणचे अभियंता सुरेश पाचंगे यांच्या नावाने दहा हजारांची लाच मागणार्या पंटरवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी कारवाई केली. या कारवाईत लाच मागणारा अनिल सुधारक सासनीक (वय-35,रा.श्रध्दा कॉलनी, महाबळ) हा अभियंता पाचंगे यांचा शालक असल्याचे तपासात उघडकीस आले. शालकामुळे मेव्हण्यावर देखील कारवाईची टांगती तलवार असून अनिलची रुग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरात तक्रारदाराचे साई सर्व्हीस नावाने कार रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. याठिकाणीवरील मिटर कमर्शियल असून त्यावर 26 केव्ही लोड सँक्शन असतांना वीज बिलात लोड 2 केव्ही असे नमूद आहेत. महावितरणच्या व्हिजीलन्सने तपासणी केली तेव्हापासून तक्रारदार यांना वाढीव बिल येऊ लागले होते.
वीजबिलात सॅक्शन लोड 26 केव्ही ऐवजी लोड 18 केव्ही अशी दुरूस्ती करण्यासाठी तक्रारदाराने अभियंता सुरेश पाचंगे यांची भेट घेतली होती. यावेळी अभियंता पाचंगे यांनी तक्रादाराला त्यांचा शालक अनिल सासनीक याला भेटण्यास सांगितले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.
त्यानुसार तक्रारदाराचा लोड दुरुस्तीसाठीचा अर्ज ऑनलाईन भरुन देण्यासाठी अनिल सासनीक याने अभियंता पाचंगे याच्या नावाने दहा हजारांच्या लाचेची मागणी केल्याने तक्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधिताची तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी कारवाई केली. तसेच लाचखोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेला अनिल हा पाचंगे यांचा शालक असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर देखील कारवाईची टांगती तलावार आहे.
अनिलने टाळली होती भेट
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणाची तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारदार हा अनिल सासनीक याला लाचेची रक्कम देण्यासाठी बोलाविले होते. परंतु अनिलने मी शिरसोलीत असल्याचे सांगत ठरलेल्या दिवशी तक्रारदारासोबत भेट टाळली होती.
पंटर अनिल पोलीस कोठडीत
पंटरकडून लाचेची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी अनिल सासनीक याला अटक करण्यात आली. तपासाधिकारी संजोग बच्छाव यांनी न्यायालयात हजर केले असता कोठडी सुनावण्यात आली असून आणखी दोघांवर कारवाईची कुर्हाड कोसळण्याची शक्यता आहे.
0 Comments