धक्कादायक! जळून खाक झालेल्या कारमध्ये आढळला जळालेला मृतदेहाचा सांगाडा; इगतपुरीत खळबळ

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत जळून खाक झालेली कार आणि या कारमध्ये जळालेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भावली धरणाजवळ असलेल्या आंबेवाडी परिसरात ही कार आढळून आली. हा अपघात की घातपात अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. या घटनेमुळे महापालिकेतील डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणाची आठवण ताजी झाली असून, ही याच घटनेची पुनरावृत्ती तर नाही ना अशी शंकाही व्यक्त होऊ लागली आहे. या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ही घातपाताची शक्यताही असू शकते असेही म्हटले जात आहे.
स्थानिक सरपंचाला आज सकाळी गावाजवळ ही जळालेली कार दिसली. जळून खाक झालेली कार पाहताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ या याबाबत घोटी पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना या जळून खाक झालेल्या कारसह कारमध्ये जळालेल्या मृतदेहाचा सांगाडा आढळला.
 कारमधील मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने त्याची ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले आहे. इतकेच नाही तर हा सांगाडा स्त्रीचा आहे की पुरुषाचा हे देखील कळू शकलेले नाही. तसेच या कारचे दोन्ही नंबर प्लेट्सही जळालेल्या आहेत. दरम्यान, हा मृतदेह फोरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कारचा तपास करण्यासाठी पोलिसांनी नाशिकच्या आरटीओ विभागाला पाचारण केले आहे. आता या कारबाबत माहिती मिळविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. इथे मोबाइलची सुद्धा रेंज देखील उपलब्ध नाही. त्यामुळे मोबाइल टॉवरचा वापर करून लोकेशन शोधणे तितकेसे सोपे नाही. इगतपुरी शहरातील हॉटेलमध्ये काही धागेदोरे सापडतात का या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत.
डॉक्टर सुवर्णा वाजे प्रकरणाची आठवण

रायगडनगरजवळ इगतपुरीला जाणाऱ्या महामार्गालगत एका कारमध्ये एका महिलेचा सांगाडा आढळून आला होता. हा सांगाडा डॉक्टर सुवर्णा वाजे यांचा असल्याचे नंतर स्पष्ट झाले. वाजे यांच्या पतीनेच त्यांची हत्या केली होती असा या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा देखील झाला होता. हे प्रकरण अशाच प्रकारचे आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e