धानोरा : रविवारी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू असतांना रात्री दहाच्या सुमारास अचानक सपोनि किरण दांडगे यांनी दहा वाजले वाद्य बंद करा असा दम गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरला. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जागेवरच ठिय्या करताच अचानक सपोनि दांडगे यांनी लाठी चार्ज केला. यामुळे संपूर्ण गावात धावपळ उडाली. विसर्जन मिरवणुक शांततेत सुरू असून सुद्धा पोलिसांच्या दबंग गिरीवर मंडळाच्या कार्यकर्त्यासह भेदरलेल्या ग्रामस्थांनी दगड फेक सुरू केली
धानोरा येथे पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणूक ४ सप्टेंबर दुपारी दोनला शांततेत सुरु झाली होती. यात सुरुवातीपासुन सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी दबंगगिरी करत गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना किरकोळ कारणांवरुन पोलिस गाडीत कोंबून ठेवले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलिसांप्रती प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. यानंतर रात्री दहा वाजता मिरवणुक ही मशिद जवळुन जात असतांना दोन मंडळ पार झाली होती. तिसरे मंडळ ओम गणेश मंडळ जात असतांना वाजंत्री अचानक बंद करा; असे पोलिसांनी सांगितले असता गणेशभक्त नाराज झाले. यावेळी काही गणेश मंडळांनी जागेवरच ठिय्या मांडला. यामुळे संतापलेल्या सपोनि दांडगे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज सुरू केला. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील यामुळे इजा झाली.
रात्री गावात पळापळ
पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संपूर्ण गावात एकच पळापळ झाली व सर्वत्र अशांतता पसरली. गणेश भक्त पोलिसांना आर्तहाकेने विसर्जन मिरवणुकी सुरू करू द्या; असे सांगत असतांना देखील सपोनि दांडगे यांनी त्यांचे काहीएक म्हणणे ऐकून न घेता लाठी चार्ज सुरूच ठेवला. यामध्ये काही गणेशभक्त जखमी झालेत, दोन फोर व्हिलरचे काचा फुटल्या, मोटारसायकल चेही नुकसान झाले.
पोलिसांवर दगडफेक
परिस्थिती गंभीर होत असल्याने कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनीही पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यामुळे पोलिस रात्री साडेदहा वाजता गावातुन काढता पाय घेतला. गणेश मंडळांनी श्रींच्या मुर्त्या जागेवरच ठेवत सपोनि किरण दांडगे यांचे निलंबन होत नाही; तोपर्यंत विसर्जन होणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या सामंजस्याने वाद मिटवण्यासाठी रात्री उशीरा दोन्ही मंडळांचे श्री विसर्जन संपन्न झाले. पोलीस व ग्रामस्थ यांच्यात वाद निर्माण झाल्याने काही मंडळांचे श्री विसर्जन थांबले होते. मध्यरात्री पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व ग्रामस्थांनी सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला त्यानंतर राहिलेल्या मंडळांचे श्री विसर्जन संपन्न झाले.
0 Comments