अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मे.आर.एस डेअरी फार्म कारखान्यावर छापा टाकून बनावट पनीर जप्त केले आहे. पथकाने १ लाख ९७ हजार ७८० रुपये किंमतीचे ८९९ किलो बनावट पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीची ५४९ किलो स्किम्ड मिल्क पावडर जप्त केली आहे.
त्याचबरोबर ४ हजार ५४४ रुपये किंमतीचे २८.४ किलो बी डी पामोलीन तेल असा एकूण ४ लाख २१ हजार ९२४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. तसेच या बनावट पनीरचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेडे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होत असल्याचे निर्दशनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच तक्रार नोंदवणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अशी माहिती प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी सांगितली आहे.
0 Comments