राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नवी मुंबईतील सीवूडमध्ये असलेल्या बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चच्या अनधिकृत आश्रम शाळेवर महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी धाड टाकली होती. या कारवाईत तेथून तब्बल 45 मुला मुलींची सुटका केली होती. यापैकी तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. ही घटना ताजी असतानाच आता याच बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमधील आणखी तीन मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये लहान मुले, मतीमंद महिला आहे. मात्र, तेथे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती ठाणे महिला बाल विकास विभागाला मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला आणि 45 मुलांची सुटका केली. या सर्वांना उल्हासनगर मधील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे.
महिला व बाल विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मुलांचे काउन्सलिंग केल्यावर आणखी तीन मुलींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची कबुली दिली आहे. याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा बाल संरक्षक अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर एनआरआय पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पास्टर येसुदासन याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
येथून सुटका करण्यात आलेल्या 12 ते 14 वयोगटातील तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या अंगाला विक्स आणि तेल लावणे, तसेच त्यांना गुंगीची गोळी देऊन झोपवून ठेवले जात होते, असे मुलींनी सांगितले आहे. यातील एका मुलीचा गर्भपात देखील केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच मुलींच्या पालकांना भेटू न देण्याचाही प्रकार समोर आले आहे.
प्रकारानंतर एकच खळबळ उडाली असून पालकांमधून आश्रमाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि पालकांनी केली आहे.
0 Comments