मुंबई: गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. 'येणाऱ्या काळात शिवसेनेतील ठाकरे गटाला जशास तसे नाही तर व्याजासह उत्तर दिले जाईल असं प्रत्युत्तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वेदांता प्रकल्पासाठी वर्षभरापूर्वीपासून महाराष्ट्रासह गुजरातही प्रयत्न करत होते. ती काय वडापावची गाडी नाही सेनाभवनावरून उचलली आणि मातोश्रीला लावली, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
बंतारा समाजाचे योगदान सर्वच क्षेत्रात आहे. जशी दुधात साखर विरघळते तसेच बंतारा समाज मिसळतो आणि गोडवासुद्धा वाढवतो. गोपाळ शेट्टी यांना भरघोस मत मिळतात. कारण सर्वांनाच असं वाटतं की कुठल्याही अडचणीत ते गोपाळ शेट्टी यांच्याकडे जाऊ शकतात. बंतारा समाजाचे सामाजिक संघटनेत योगदान आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी बंतारा सामाजाच्या कार्यक्रमावेळी केले.
माझं नाव देवेंद्र शेट्टी फडणवीस असते तर २, ४ हॉटेल माझ्या नावावर असतील, या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. कुटुंबासाठी तर आपण जगतोच पण आपल्या समाजासाठी, देशासाठी सुद्धा जगणे महत्वाचे आहे आणि हेच बंतारा समाजाच्या माध्यमातून होत आहे. तुमची प्रगती म्हणजे राज्याची, देशाची प्रगती आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी खासदार शरद पवार यांच्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी जे वक्तव्य केले आहे. वेंदातांबाबत त्यांच्या सारख्या राजकारण्याची किव येते, मोठा फुगा पवारांनी केला आहे, उद्धव ठाकरे यांच्या हातात देऊन त्यांना खेळवलं जात आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले, कोकणातल्या युवा नेतृत्वाला म्हणजेच उदय सामंत यांना मंत्रीपद मिळाले पण भास्करराव जाधवांना साधं सेनेत राज्यमंत्रीपदही नाही. ही त्यांच्या पोटात पोटशूळ आहे. याच उद्देशाने चर्चेत राहण्यासाठी ते अशी टिका टिप्पणी करत असतात. ते जर का आता बोलले नाहीत तर त्यांना काही मिळणार नाही या उद्देशाने ते बोलत असतात. या पूर्वी ते उद्धव ठाकरेंवरही बोलले आहेत, असंही फडणवीस म्हणाले.
0 Comments