दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गुजरात राज्यातुन अटक

नंदुरबार येथील श्री.ज्वेलर्स दरोड्याचे गुन्ह्यातील 14 वर्षांपासुन फरार आरोपीस  स्थानिक गुन्हे शाखेने  गुजरात राज्यातुन अटक  केली आहे.

याबाबत अधिक महिती अशी की, बेड्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा . डॉ . बी . जी . शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये गुन्हा घडल्यापासून आज पर्यंत फरार, पाहिजे किंवा फेर अटक आरोपीतांना अटक करण्याबाबत संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात विशेष मोहीम राबविणेबाबत आदेशीत केले होते . त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांचे स्वतंत्र पथक स्थापन करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील जास्तीत जास्त फरार , पाहीजे आरोपी व फेर अटक आरोपी अटक करणेबाबत सुचना दिल्या होत्या .

दि.8 जुलै 2008 रोजी सकाळी 8.45 वा . सुमारास नंदुरबार शहरातील टिळक रोडवरील श्री.ज्वेलर्स सराफ दुकानाचे मालक दुकान उघडत असतांना अज्ञात 5 ते 6 इसम सेंट्रो चारचाकी वाहनामध्ये येवून रिव्हॉल्वरने गोळी झाडून हत्याराचा धाक दाखवून श्री.ज्वेलर्सचे 5 लाख 97 हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने असा ऐवज जबरीने चोरुन नेला म्हणून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 395 397 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .

त्यावेळी सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने तपास लावुन 5 संशयीत आरोपी यांना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला होता , परंतु सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी प्रतापसिंग सुलतानसिंग सिकलीकर रा . एकता नगर , नंदुरबार हा मुख्य आरोपी होता , परंतु तो गुन्हा घडल्यापासुन फरार होता व पोलीसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाला होता .

दि.18 सप्टेंबर 2022 रोजी सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी प्रतापसिंग सुलतानसिंग सिकलीकर हा गुजरात राज्यातील मांडवी येथे येणार असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती . पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदर बातमीची खात्री करुन पाहिजे आरोपी अटक करण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ गुजरात राज्यातील मांडवी येथे रवाना केले .

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातील मांडवी गाठून तेथे पाहिजे आरोपी प्रतापसिंग सिकलीकर याचा शोध घेण्यास सुरुवात केली . परंतु आरोपी हा अत्यंत चालाख असुन पोलीसांना वेळोवेळी गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता . तो सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करुन फिरत होता . त्यामुळे त्यास ओळखणे देखील कठीण झाले होते .

नमुद आरोपी हा एका गॅरेजवर असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास निदर्शनास आल्याने पथकाने गॅरेजचे बाहेर सापळा लावला . आरोपी गॅरेजचे बाहेर येत असतांना त्यास पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला . परंतु पथकाने लावलेला सापळा मजबुत असल्याने त्यास पळुन जाता आले नाही व तो पोलीसांच्या सापळ्यात अडकला . त्यास पथकाने ताब्यात घेऊन पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात हजर केले आहे .

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी , पोलीस नाईक विशाल नागरे , सुनिल पाडवी , बापू बागुल , मोहन ढमढेरे यांचे पथकाने केली आहे .

14 वर्षांपासून फरार असलेल्या श्री ज्वेलर्सच्या दरोड्याचे गुन्ह्यातील आरोपीस गुप्त बातमीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातील मांडवी येथे सापळा लावुन ताब्यात घेतल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी संपुर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e