महाराष्ट्रासह देशाला हादरवणाऱ्या घटनेचा ११ वर्षांनी लागला निकाल, शिक्षा ऐकताच आरोपी कोसळला

मनमाड : अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा  तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला आहे. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी २०११ मध्ये इंधन माफियांनी जिवंत जाळून त्यांची हत्या केली होती. या घटनेतील मुख्य आरोपी पोपट शिंदे याचा आधीच मृत्यू झाला आहे. तर यातील कुणाल शिंदे याच्यावर बालन्यायालयात खटला सुरू आहे. उरलेल्या तिघा आरोपींना ३०२ सह विविध कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला २५ जानेवारी २११ ला अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे मनमाडपासून जवळ असलेल्या इंधनाच्या अवैध अड्ड्यावर छापा मारण्यासाठी गेले होते. यावेळी इंधन माफियांनी त्यांना जिवंत जाळून त्यांची हत्या केली होती. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोपट शिंदे हा होता. यासोबतच मच्छिंद्र सुरवडकर, राजू सिरसाट, अजय सोनवणे आणि कुणाल शिंदे असे पाच आरोपी होते. त्यापैकी पोपट शिंदेचा मृत्यू झाला आहे. तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायलयात खटला सुरू आहे.

मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू होते. सरकारतर्फे सीबीआय वकील ॲड मनोज चालधन, ॲड अभिनवकृष्णा यांनी तर आरोपीच्या वतीने नाशिक येथील ॲड राहुल कासलीवाल यांच्या आतंर्गत ॲड अच्युत निकम व मनमाड येथील ॲड सागर गरुड यांनी कामकाज पाहिले. या घटनेने तेव्हा संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पेट्रोलियम मंत्रालयाने त्यावेळी अनेक कठोर कायदे करून पेट्रोल डिझेलच्या अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती.

या घटनेतील आरोपी हे जामिनावर होते. आज सुनावणी दरम्यान ते मालेगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर होते. न्यायाधीश डी. वाय. गोंड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. शिक्षा ऐकताच आरोपी नंबर दोन मच्छिंद्र सुरवडकर याला छातीत दुखायला लागले आणि तो तेथेच कोसळला. त्याला तात्काळ सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e