औरंगाबाद : शाळा सुटल्यानंतर शहर वाहतूक बसमधून घरी निघालेल्या विद्यार्थ्यांला खिडकीतून डोके बाहेर काढणे जिवावर बेतणारे ठरले. हरिओम राधाकृष्ण पंडित (वय १५) याचा एका लोखंडी फाटकावर डोके आदळल्याने मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मैदानावर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद क्रांती चौक पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी दिली. बजाजनगर येथील मोहटादेवी भागातील रहिवासी असलेला हरिओम पंडित हा येथील सरस्वती भुवन शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता.
शाळेच्या सध्या प्रथमसत्र परीक्षा सुरू असून सोमवारी प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर हरिओम दररोजच्या प्रमाणे औरंगपुऱ्यातील शहर वाहतूक बस थांब्याजवळ उभा होता. हरिओमसह काही विद्यार्थ्यांनी बस येताच त्यामध्ये प्रवेश केला. बस वळवून आणण्यासाठी चालकाने जिल्हा परिषद मैदानाकडे नेली. या दरम्यान, हरिओमने खिडकीतून डोके बाहेर काढले. त्याचे डोके लोखंडी फाटकावर आदळले. यामध्ये डोक्याला जबर मार लागल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन हरिओमचा मृत्यू झाला. राधाकृष्ण पंडित यांना एक मुलगा व एक मुलगी असून पंडित यांचा वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये छोटा कारखाना आहे.
0 Comments